
प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांची शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा जिल्ह्यातील शिक्षक संघटनांतर्फे सत्कार करण्यात आला होता.
नगर ः जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगले काम केलेले आहे. सध्या सगळीकडे बिनविरोध निवडणुकीचे वारे सुरू आहे. तेव्हा शिक्षक बॅंकेची निवडणूकसुद्धा बिनविरोध झाली तर शिक्षकांचे पगार लवकर करून सुट्ट्या जादा देण्यात येतील.
नियमित पगारासाठी प्रशासन सहकार्य करील. तेव्हा सर्व शिक्षक संघटनांनी याचा विचार करावा, असे मिश्किल आवाहन शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी केले.
प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांची शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा जिल्ह्यातील शिक्षक संघटनांतर्फे सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी टेमकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे, उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण, गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे, संजय कळमकर, राजू साळवे, सलीमखान पठाण, आबा लोंढे, राजू राहणे, संजय धामणे, राजू शिंदे, राजेंद्र निमसे आदी उपस्थित होते.
बाळासाहेब चाबुकस्वार यांच्या पुढाकाराने सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगेश खिलारी यांनी सूत्रसंचालन तर नितीन पंडित यांनी आभार मानले.