
Ahmednagar School News : थंडीमुळे शाळा उशिरा भरवा
अहमदनगर : जिल्ह्यात वाढत्या कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या सत्रात भरणार्या शाळांची वेळ उशिराने करण्याची मागणी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना मदत वैद्यकीय कक्षाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी शिवसेना (बाळासाहेबांची) जिल्हा संपर्कप्रमुख तथा मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे रणजित परदेशी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत शेळके, शहर प्रमुख अनिकेत कराळे, तारिक कुरेशी आदी उपस्थित होते.
सध्या राज्यासह शहरात थंडीची तीव्र लाट सुरू आहे. शासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत सकाळच्या सत्रात सकाळी लवकर उठून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. पारा गोठवणार्या थंडीत विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे शारीरिक हानी होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
थंडीची तीव्रता लक्षात घेऊन शहरासह जिल्ह्यात सकाळच्या सत्रातील शाळा एक ते दीड तास उशिराने भरवण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. याबाबत तातडीने निर्णय घेऊन सर्व शाळांना आदेशित करण्याचे म्हटले आहे.