esakal | भर पावसात रोहित पवार बांधावर; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
sakal

बोलून बातमी शोधा

mal rohit pawar inspected the agriculture in Jamkhed damaged due to heavy rains

भर पावसात रोहित पवार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

जामखेड (जि. नगर) : जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार भर पावसात शेताच्या बांधावर पोचले आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. एका ठिकाणी चिखलाने माखलेला रस्ता पाहून, अपेक्षित ठिकाणी पोचणे अवघड असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालविणे पसंत केले अन् कार्यकर्त्यांसह संबंधित ठिकाणी पोचले.मांजरेच्या तीरावरील दिघोळ, जातेगाव या गावांपाठोपाठ तेलंगशी, धामणगाव, मोहरी, सातेफळ, वंजारवाडी, तरडगाव, धनेगाव या गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. यांपैकी मांजरेच्या काठावरील गावांना पवार यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर नायगाव येथील नुकसानग्रस्त शेताची पाहणी करण्यासाठी ते नायगावात दाखल झाले. मात्र, चिखलमय रस्त्यावरून प्रवास करणे अशक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कार्यकर्त्यांना घेऊन थेट ट्रॅक्टरवर बसून, नुकसान झालेल्या शेताच्या बांधावर जाऊन संवाद साधला. ओव्हर फ्लो झालेल्या नायगाव तलावात जलपूजन केले.

तालुक्‍यातील काही गावांना मागील तीन दिवसांपासून अतिवृष्टीचा तडाखा बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पवारांनी दौरा केला. त्यांनी बांधखडक येथून जामखेड व भर पावसात कुसडगाव गाठले अन् पावसात उसाच्या शेताची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी महसूल कर्मचाऱ्यांना दिले.

हेही वाचा: 'मी संगमनेरकर' आंदोलनाला यश! अखेर स्थानिकांना टोलमधून दिलासा

loading image
go to top