esakal | '..नाही तर मी गळा कापून घेईन!' तरुणाच्या रुद्रावताराने पोलिस अवाक
sakal

बोलून बातमी शोधा

police officer

'..नाही तर मी गळा कापून घेईन!' तरुणाच्या रुद्रावताराने पोलिस अवाक

sakal_logo
By
निलेश दिवटे

कर्जत (जि. नगर) : माझी बायको आत्ताच आणून द्या, नाही तर मी माझा गळा तुमच्यासमोर कापून घेईन, असा आवाज ऐकू आला अन् समोरील दृश्य पाहून पोलिसदेखील अवाक झाले. (man threatened the police with suicide in front of them)

त्याचे असे झाले, बुधवारी (ता. २८) रात्री दहाच्या सुमारास रोहित दीपक काळे (रा. शिंदे, ता. कर्जत) हा हातात ब्लेड घेऊन, अंगावर वार करून घेऊन पोलिस ठाण्यात आला. सोबत त्याचा चुलत भाऊ सोमनाथ काळे होता. या वेळी रोहित पोलिसांना म्हणाला, की माझ्या बायकोला सासरा पीतांबर साताऱ्याला घेऊन गेला आहे. माझी बायको आत्ताच आणून द्या, नाही तर मी माझा गळा तुमच्यासमोर कापून घेईन. हातातील ब्लेड त्याने गळ्याला लावले. त्यावेळी ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी त्याची समजूत काढून, तुझी बायको आणून देतो, असे सांगितले. मात्र, तो धमकी देत, आत्महत्या करीन असे म्हणू लागला. त्याचा चुलत भाऊ सोमनाथ व्हिडिओ रेकॉर्डिंग करीत होता.

झडप घालून पकडले हात

या वेळी प्रसंगावधान राखत ठाणेअंमलदार पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रबोध हंचे यांनी त्याच्या सासऱ्यांकडे पोलिस ठाण्याच्या दूरध्वनीवरून त्याच्या पत्नीच्या मोबाईलवर संपर्क केला. तिचे रोहितशी बोलणे सुरू झाले. गंभीर परिस्थिती समजल्यावर तिने त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्या वेळी रोहित काळे बेसावध होता. या संधीचा फायदा घेत पोलिस कॉन्स्टेबल इरफान शेख, गोवर्धन कदम, तसेच बळिराम काकडे यांनी झडप घालून रोहित काळे याचे दोन्ही हात पकडत त्याच्यावर नियंत्रण मिळविले. हातातील ब्लेड काढून घेतले.

हेही वाचा: डोंगर पोखरुन हाती उंदिर..! 10 गावांना 100 पोलिसांचा विळखा, सापडले दोघे

या दोघांनाही पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश माने यांनी ताब्यात घेऊन, खात्री करून वैद्यकीय तपासणी केली. त्यामध्ये रोहित काळेवर स्वतःला जखमा करून घेणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे आणि त्याचा भाऊ आरोपी सोमनाथ काळेवर आत्महत्येसाठी चिथावणी देणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

बऱ्याच वेळा प्रशासनाला विनाकारण वेठीस धरण्यासाठी काही लोक बेकायदेशीर कृत्य करण्याचा प्रयत्न करतात. तसे न करता आपले म्हणणे पोलिस ठाण्यात व्यवस्थितरीत्या मांडावे, त्यावर पोलिस कार्यवाही करतील.

- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कर्जत

हेही वाचा: …तर नाशिक, कोपरगावात चिपळूणची पुनरावृत्ती; जलतज्ज्ञ चितळेंच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

loading image
go to top