esakal | अॉक्सीजनची कंपनी कुठे चालते का, लोकांनी काढलं वेड्यात, आता...

बोलून बातमी शोधा

Many lives were saved because of the oxygen company in Nevasa
अॉक्सीजनची कंपनी कुठे चालते का? लोकांनी वेड्यात काढलं, आता...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोनई (अहमदनगर): सध्या भारतात आणि महाराष्ट्राला एकाच गोष्टीचा ध्यास लागला आहे. तो म्हणजे रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि अॉक्सीजन सिलिंडर. त्याअभावी रूग्ण प्राण सोडत आहेत.

चिलेखनवाडी (ता.नेवासे) येथे तीन वर्षांपूर्वी उभा राहिलेला ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आज जिल्ह्यासाठी तारणहार ठरत आहे. बजरंग पुरी यांच्या कष्टातून साकारलेला हा प्रकल्प आताच्या कोरोना स्थितीत अनेकांसाठी देवदूत म्हणून उपयोगी पडत आहे.

हेही वाचा: ह्रदयद्रावक ः दोन्ही मुले नाही आली, तहसीलदारांनीच दिला अग्निडाग

सन २०१९ मध्ये सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बजरंग पुरी (राहणार नांदुरघाट ता.भूम जि.उस्मानाबाद) यांनी लेखनवाडी येथे जमीन घेवून अंदाजे पाच कोटी रुपयांची गुंतवणूक केली. सुलोचनाबाई इंडस्ट्रीज नावाचा ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभा केला.

छोटे उद्योग व कंपन्यांसाठी ते ऑक्सीजन सिलिंडर तयार करीत होते. त्यांच्या या प्रयत्नांस अनेकांनी नाव ठेवली. हेटाळणीला न डगमगता पुरी परीवार कष्टाला देवता मानत काम करीत राहिल्याने आता कुठे त्यांच्या कष्टाला समाधानाचे फळ मिळाले आहे.

कंपन्यांसाठी ते येथे रोज शंभर ऑक्सीजन सिलिंडरची निर्मिती होत होते. मागील वर्षी कोरोना संसर्गाची स्थिती वाढल्यानंतर जिल्ह्यातील हा एकमेव प्रकल्प राज्याच्या नकाशावर आला. बजरंग पुरीसह आशिष व मंगेश पुरी येथील संपूर्ण व्यवस्था सांभाळत आहेत. सध्या येथे गावातीलच पस्तीस कामगार चोवीस तास काम करून तीन टन ऑक्सीजन तयार करीत आहेत.

५०० सिलिंडर नगर जिल्ह्यासाठी

रोज तयार होणारे पाचशे मोठे सिलिंडर नगर, नेवासे व शेवगाव येथील २४ कोविड सेंटरला व काही खाजगी रुग्णालयास दिले जात असल्याचे आशिष व मंगेश पुरी यांनी सांगितले. सध्या रोज दीड ते दोन हजार सिलिंडरची मागणी आहे. मात्र, निर्मिती क्षमता तेवढी नसल्याने ते शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वी घरोघरी जाऊन सिलिंडर विकले

काही तरी नाविन्यपूर्ण करावं म्हणून एका खेडेगावात आम्ही धाडस केले. जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर अवघड काहीच नसते. याचा प्रत्यय आम्हास आला. पहिल्या वर्षी चार, पाच जिल्ह्यात फिरुन ग्राहक तयार केले. रोज शंभर सिलिंडर जात होते. आता घरबसल्या पाचशे सिलिंडर विकत आहेत.

कष्टाचे चीज होतेय

नफा-तोटा याचा विचार न करता आमच्या कष्टाचा हा ऑक्सीजन अनेकांचा जीव वाचवत असल्याने खूपच आत्मिक समाधान आहे, असे बजरंग पुरी यांनी सांगितले.

चिलेखनवाडी येथील ऑक्सीजन प्रकल्प खरोखर तालुका व जिल्ह्यासाठी महत्वाचा ठरला आहे. अतिशय अडचणीच्या काळात बजरंग पुरी यांचा प्रकल्प खरोखरच प्राणवायू ठरला आहे.

- अभिराज सूर्यवंशी, नेवासे तालुका आरोग्य अधिकारी

बातमीदार - विनायक दरंदले