मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलकांचा महामार्गावर ठिय्या; 28 जणांना अटक 

सुनील गर्जे
Thursday, 23 July 2020

मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांनी गोदावरी नदीत उडी टाकून दिलेल्या बलिदानाला दोन वर्षे पूर्ण झाले.

नेवासे (अहमदनगर) : मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांनी गोदावरी नदीत उडी टाकून दिलेल्या बलिदानाला दोन वर्षे पूर्ण झाले. आज बलिदान दिन निमित्त त्यांच्या परिवारातील सदस्यांनी पुलावर शिंदेंच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. 

दरम्यान गोदावरी पुलाकडे निघालेल्या मराठा आरक्षण आंदोलकांना पोलिसांनी महामार्गावरील गंगापूर फाटा (जि. औरंगाबाद) येथे अडवले असता आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी २८ आंदोलकांना अटक केली आहे.

काकासाहेब शिंदे यांच्या बलिदान दिनी मराठा क्रांती ठोक मोर्चाने मराठा आरक्षणाबाबत विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे नगर- औरंगाबाद पोलिसांनी कोरोनाची पार्श्वभूमीवर व अभिवादन व आंदोलनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून नगर-औरंगाबाद पोलिसांनी या महामार्गावरील प्रवरसंगम येथील गोदावरी पुलावर पहाटे चार वाजल्यापासूनच या महामार्गावरील वाहातूक बंद केली. पांढरीपुल ते वाळुंज असा सुमारे 394 पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला होता.

आंदोलकांनी गनिमीकावा करून आंदोलन करण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनीही तशी व्यूहरचनाही आखली होती. आंदोलक हे काही अंतराने विविध चारचाकी वाहनांतुन गोदावरी पुलाकडे येत असतांनाच औरंगाबादच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव, गंगापूरचे पोलिस निरीक्षक प्रकाश सुरोवसे यांच्या पथकाने त्यांना नगर- औरंगाबाद महामार्गावरील गंगापूर फाटा येथे अडवले. 
आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या मारत घोषणा दिल्या. पोलिसांनी रमेश केरे, योगेश शेळके, अप्पा कुडेकर यांच्यासह इतर आंदोलकांना ताब्यात घेऊन गुन्हे नोंदवून अटक केली. काकासाहेब शिंदे यांचे वडील दत्तात्रेय शिंदे, भाऊ अविनाश शिंदे यांच्यासह आई व बहीण यांनी गोदावरी पुलावर शिंदे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी नेवासाचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे, गंगापूरचे पोलिस निरीक्षक प्रकाश सुरोवसे उपस्थित होते.
संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha 28 people arrested on Aurangabad Ahmednagar highway