अण्णांनी कलेक्टरांना दिलेल्या गिफ्टचीच चर्चा

एकनाथ भालेकर
Monday, 2 November 2020

अहमदनगरचे नुतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची सदिच्छा भेट घेतली.

राळेगण सिद्धी (अहमदनगर) : अहमदनगरचे नुतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यात सुमारे एक तास झालेल्या चर्चेत हजारे यांनी आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रशासनात चांगले काम केले तर जिल्हा, राज्य व देशात विधायक परिवर्तन करण्याची ताकद असल्याचे मत व्यक्त केले.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकताच पदाचा कार्यभार स्विकारला. रविवारी पुण्याहून नगरला येताना जिल्हाधिकारी भोसले यांनी राळेगणसिद्धी येथे सायंकाळी हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी भोसले यांनी सोलापूर व इतर ठिकाणी काम केलेल्या कामकाजाची माहिती हजारे यांना दिली. तसचे नगर जिल्ह्यात काम करताना आपले आशीर्वाद व मार्गदर्शन मिळावे, ही विनंती केली.

यावेळी हजारे यांनी राळेगणसिद्धीतील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातील माथा ते पायथा, बंधा-यांतील प्लॅस्टिक कागद अस्तरीकरण प्रयोगातील यशस्वीतेची माहिती जिल्हाधिकारी भोसले यांना दिली. आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांनी सकारात्मक भुमिका घेऊन चांगले काम केले तर तर जिल्हा, राज्य व देशात परिवर्तन करण्याची ताकद आहे. जिल्हाधिकारी भोसले यांनी इतर जिल्ह्यांत केलेले चांगले काम नगर जिल्ह्यात चांगले काम करावे असे मत यावेळी झालेल्या चर्चेत हजारे यांनी व्यक्त केले.
हजारे यांच्या लोकपाल, माहिती अधिकार आंदोलनातील अनेक घटनाक्रम व चांगल्या गोष्टी आपण नेहमी पाहत असायचो, अशी आठवण जिल्हाधिकारी भोसले यांनी या वेळी चर्चेत काढली.

या वेळी तहसिलदार ज्योती देवरे, नायब तहसिलदार रणदिवे रावसाहेब, पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर, माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, तलाठी अशोक डोळस, शिवाजी शिंदे, सचिन पोटे आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meet with Anna Hazare and District Collector Rajendra Bhosale