मिशन ‘वन फोर्टी फोर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Meeting of office bearers of Shirdi Lok Sabha constituency Ahmednagar

मिशन ‘वन फोर्टी फोर’

शिर्डी - लोकसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा कालावधी असताना भाजपने आतापासूनच संघटनात्मक पातळीवर मोठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ताब्यात नसललेल्या देशभरातील एकशे ४४ मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच या प्रत्येक मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः भाजपचे कार्यकर्ते आणि सहानुभूतीदारांचे मेळावे घेणार आहेत. त्यापूर्वी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार तेथे तीन-चार दिवस मुक्काम करून निवडक मंडळींच्या गाठीभेटी घेतील. संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतील. तेथील अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे सादर करतील. या मिशन वन फोर्टी फोरचा एक भाग म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच शिर्डीत पार पडली.

राज्यात भाजपच्या ताब्यात नसलेल्या सोळा जागा आहेत. प्रत्येकी चार जागांचे एक, या प्रमाणे चार क्लस्टर तयार करण्यात आलेत. प्रत्येक क्लस्टरसाठी प्रदेश कार्यालयाकडून एक क्लस्टर प्रमुख नेमण्यात आला. संघटनात्मक बांधणी वेगाने पक्की करण्याची तयारी भाजपने सुरू केली. मतदार यादीतील प्रत्येक पानाचा प्रमुख, बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख या पदांच्या नियुक्त्या आणि केलेल्या कामाचा आढावा घेण्याचे काम सुरू झाले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी मानधन देऊन पूर्णवेळ विस्तारक नेमण्यात आले. या विस्तारकाने विविध गावांत जाऊन तेथील विविध समाज घटकांचे नेते, डॉक्टर, उद्योजक, संत-मंहत तसेच विरोधकांच्या गाठीभेटी घ्यायच्या. त्याबाबतची माहिती दररोज प्रदेश कार्यालयाला कळवायची आहे.

केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदारांचे निवासी दौरे सुरू होतील, त्यावेळी ते या मंडळींसोबत स्नेहभोजन आणि चर्चा करतील. संघटनात्मक बांधणी आणि तेथील राजकीय परिस्थितीचा अहवाल थेट पंतप्रधान कार्यालयाला पाठवीला जाईल. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी या सर्व लोकसभा मतदारसंघात जाऊन कार्यकर्ते, पदाधिकारी, पन्नाप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख आणि नव्याने जोडलेल्या विविध समाजघटक प्रमुखांचे मेळावे घेऊन त्यांच्या सोबत थेट संवाद साधतील. अशी मोठी तयारी भाजपने सुरू केली आहे. शिर्डी येथे आयोजित बैठकीनंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातवरील नियोजना नुसार संघटनात्मक बांधणीचे काम भाजपने सुरू केले आहे.

उमेदवारीसाठी वयाची अट?

भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे तिकीट वाटप करताना वयाची अट लावण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी हैद्राबाद येथे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्याबाबत सूतोवाच केले. आमदार किंवा खासदार होणाऱ्या उमेदवाराला किमान पंचवीस वर्षे पक्षासाठी योगदान देता यायला हवे, हा निकष लक्षात घेऊन त्याच्या वयाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे, असे एका भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगीतले.

Web Title: Meeting Of Office Bearers Of Shirdi Lok Sabha Constituency Ahmednagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpshirdiloksabhaMeetings