esakal | मंगल कार्यालय संघटनेची उद्या मुख्यमंत्र्याबरोबर बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

Meeting of Sangamner loan Association with Chief Minister tomorrow

राज्य सरकार दिडशे चौरस फूट आकाराच्या एसटीबसमध्ये 50 प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देते.

मंगल कार्यालय संघटनेची उद्या मुख्यमंत्र्याबरोबर बैठक

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : राज्य सरकार दिडशे चौरस फूट आकाराच्या एसटीबसमध्ये 50 प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देते. मग १० ते २० हजार चौरस फुट ते दोन एकर क्षेत्रफळ असलेल्या मंगल कार्यालयात विवाहासाठी ५०० ते हजार लोकांना किंवा हॉल क्षमतेच्या 50 टक्के लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्याची मागणी लॉन्स व मंगल कार्यालय चालक, मंडप डेकोरेटर्स, केटरिंग, बँड आदी संघटनेच्या संगमनेरात झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. 

विविध मागण्यांसाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार आहे. याची चर्चा करण्यासाठी सोमवारी ( ता. 5) संगमनेर व अकोले तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी मुंबईला जाणार असल्याची माहिती, संगमनेर लॉन्स व मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष गोरख कुटे, अकोलेचे अध्यक्ष रोहीदास धुमाळ यांनी दिली.

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार दोनशे तर राज्य सरकारच्या निर्णयानुसार शंभर लोकांना तसेच नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केवळ 50 लोकांना विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची परवानगी आहे. त्यामुळे निर्माण झालेला संभ्रम दुर होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा जानेवारीपासून मंगल कार्यालय चालक पुढील बुकिंगवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मंगल कार्यालय, लॉन्स आदी ठिकाणी विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी 500 ते 1000 लोकांना परवानगी द्यावी.

ग्रामपंचायत व नगरपालिकेने सर्व कर माफ करावेत. बँकांनी कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी, कोरोना काळातील वीज बील माफ करावे आदी मागण्या या वेळी मांडण्यात आल्या. या बैठकीला संगमनेर अकोले तालुक्यातील सर्व मंगल कार्यालय, लॉन्स चालक, केटरर्स, मंडप लाईट डेकोरेशन, फ्लॉवर डेकोरेटर्स पॅकेज, सनई चौघडा अशा विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एका लग्न सोहळ्यात सुमारे दिडशे ते साडेतिनशे कुटूंबांना रोजगार मिळतो. सरकारने परवानगी दिल्यास कोरोना काळात थांबलेले अर्थचक्र फिरु लागून, लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो. याचा फायदा कररुपाने अप्रत्यक्षरित्या सरकारला होणार आहे याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा असा विचार या बैठकीत मांडण्यात आला.

यावेळी संगमनेर शहर, तालुक़ा लॉन्स मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष गोरख कुटे, उपाध्यक्ष रामनाथ कुऱ्हे, सचिव अनिल राऊत, अकोले मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष रोहीदास धुमाळ, उपाध्यक्ष प्रवीण झोळेकर, सचिव संतोष नवले तसेच मंडप डेकोरेशनचे अध्यक्ष सुखदेव जोंधळे आदींसह सर्व लॉन्स व मंगल कार्यालय चालक मालक व विविध संघटनेचे सर्व सभासद व पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर