ज्यांच्याकडे बंगले आहेत ते सध्या भटके झालेत, आमच्या घरांना भिंतीही नाहीत

राजेंद्र सावंत
Monday, 9 November 2020

राज्यात शेतकरी हतबल होवुन आत्महत्या करीत होते. आता कोरोनामुळे कला सादर करता येत नसल्याने व पोटाचा प्रश्न निर्माण झाल्याने तमाशा कलावंत आत्महत्या करायला लागले आहेत.

पाथर्डी (अहमदनगर) : राज्यात शेतकरी हतबल होवुन आत्महत्या करीत होते. आता कोरोनामुळे कला सादर करता येत नसल्याने व पोटाचा प्रश्न निर्माण झाल्याने तमाशा कलावंत आत्महत्या करायला लागले आहेत. 

महाराष्ट्राची लोककला लोपपावताना सरकारने सकारात्मक भावनेतुन तमाशांना परवानगी देवुन कलाकारांना आधार द्यावा, असे आवाहन तमाशा कलावंत महामंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडेकर यांनी केले. कोरडगाव येथे कलावंत न्यायहक्क समितीच्या वतीने राज्यातील तमाशा व विविध कलावंत, तमाशा फडमालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

हेही वाचा : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी घेतली मंत्री शंकरराव गडाख परीवाराची भेट
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याच्या कलावंत विकास मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडेकर होते. यावेळी तमाशा पड मालक, शिवकन्या कचरे, संदिप निकम, काळुबाळु तमाशाचे संपत खाडे, विजय खाडे, लता लंका पाचेगावकर, मुस्सा इनामदार, सुनिताताई काडगावकर, हरिभाऊ बडे, भगवान राउत यांच्या सह मोठयाप्रमाणात कलावंत उपस्थीत होते. 

खेडेकर म्हणाले, राज्यामध्ये साडेआठ लाख तमाशा कलावंत सध्या असुन १४० तमाशाचे फड आहेत. शासनाकडे फक्त दोन लाख पन्नास हजार कलावंताची नोंद आहे. तमाशा कलावंत कला सादर केल्यानंतर खरा त्याच्या पोटाचा प्रश्न सुरु होतो. ज्यांच्याकडे बंगले आहेत ते सध्या भटके झाले आहेत. आमच्या घरांना भिंतीच नाहीत साधे पडदे आहेत आणि रोज कोठे हे ही कळत नाही, अशी तमाशा कलावंतांना शासनाने पक्की घर देण्याचे काम केले पाहीजे.

आम्हाला कामाची लाज नाही आम्ही खानदानी तमाजगीर आहोत. आमचे आईवडील देखील याच क्षेत्रामध्ये होते. तमाशामध्ये मालक आणि कलाकारांचे एकच ताट आणि जेवण असते सर्व एकत्रच रहातात. कलावंत हा रडण्याच्या वेळी रडतो, हसण्याच्या वेळी हसतो आजपर्यंत एकाही तमाशा कलावंतानी आत्महत्या केली नाही इतका तो खंबरी आहे. परंतु दुदैवाने त्यांच्याकडे पाहणारे मायबाप सरकार आज नाही. आमच्यासाठी जर कोणी घाम गाळण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्यासाठी रक्त देवु. 

राज्यातील नेत्यांनी आमच्याकडे व आमच्या कुटुंबाकडे पहावे. तमाशा लवकर सुरु करण्याची परवानगी दयावी. कलावंताच्या प्रलंबीत मानधनाचे प्रश्न मार्गी लावावेत. कोरडगावचे सरपंच विष्णू देशमुख, सेवा संस्थेचे चेअरमन नारायणराव काकडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रविंद्र म्हस्के, अभिजित देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवकन्या कचरे यांनी तर आभार गणेश कचरे यांनी मानले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting of Tamasha artists in Pathardi taluka