....अन्यथा कोरोना सर्व्हेवर बहिष्कार!

शांताराम काळे
Friday, 11 September 2020

कोरोना सर्वेचा पुरेसा मोबदला न देता आशा सेविकांना प्रतिदिन केवळ 33 रुपये व आशा गट प्रवर्तकांना प्रतिदिन 16 रुपयात राबवून घेतले जात आहे. कोरोना महामारीपासून संरक्षणाची कोणतीही पुरेशी साधने न देता महिला कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे राबवून घेणे थांबवा.

अकोले (अहमदनगर) : कोरोना सर्वेचा पुरेसा मोबदला न देता आशा सेविकांना प्रतिदिन केवळ 33 रुपये व आशा गट प्रवर्तकांना प्रतिदिन 16 रुपयात राबवून घेतले जात आहे. कोरोना महामारीपासून संरक्षणाची कोणतीही पुरेशी साधने न देता महिला कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे राबवून घेणे थांबवा. स्थानिक विकास निधितून कोरोना सर्वेसाठी आशांना प्रतिमहिना किमान 3000 रुपये व आशा गट प्रवर्तकांना किमान 5000 रुपये अतिरिक्त मानधन द्या, अन्यथा कोरोना सर्वेवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा सिटू संलग्न जनशक्ती आशा कर्मचारी संघटनेने दिला आहे. 

अकोले तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत आशा कर्मचारी व गट प्रवर्तकांनी या बाबतचे निवेदन अकोले तहसीलदार मुकेश कांबळे यांना दिले.  पुढील आठ दिवसात निर्णय न झाल्यास कोरोना सर्वेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय यावेळी आशांनी जाहीर केला आहे.

ग्रामपंचायत व नगरपालिकास्तरावर उपलब्ध असलेल्या स्थानिक विकास निधीतून महिन्याला 3000 रुपये कोरोना सर्वेसाठी तरतूद करणे अजिबात अवघड काम नाही. नेत्यांच्या सत्कारासाठी हजारो रुपयांचा चुराडा करणाऱ्या ग्रामपंचायती व नगर परिषदा कोरोना सर्वेसाठी अशाप्रकारची तरतूद करायला तयार नसतील तर आशा सुद्धा आपला व आपल्या परिवाराचा जीव धोक्यात टाकून केवळ 33 रुपयात सर्वे करायला तयार नाहीत. अशी निः संदिग्ध भूमिका संघटनेने घेतली आहे. 

स्थानिक विकास निधीतून आशांना सॅनिटायझर, ग्लोज, मास्क सह इतर पुरेशी संरक्षण साधने उपलब्ध करून द्या, कोरोना संसर्ग झाल्यास आशा कर्मचारी, गट प्रवर्तक व त्यांच्या कुटुंबाला प्राधान्याने तपासणी व मोफत उपचार उपलब्ध करून द्या, तालुक्यातील जनतेसाठी तालुक्यातच कोरोना तपासणीची पुरेशी सुविधा उपलब्ध करा, खानापूर कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना पुरेशा सुविधा उपलब्ध करा या मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

भारती गायकवाड, संगीता साळवे, सुनीता गजे, अस्मिता कोते, सुजाता गायके, मंगल गावंडे, चित्रा हासे, चित्रा डगळे, आशा उगले, जानका परते, रुपाली तातळे, स्वाती ताजने, मनिषा मंडलिक, शालिनी वाकचौरे, नैना पांडे, संगीता धुमाळ, आशा देशमुख, चंद्रकला हासे, वंदना बांगर, विद्या वाकचौरे, सविता गाडे आदींनी यावेळी आशा कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या मांडल्या. तहसीलदार श्री मुकेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गंभीरे यांनी मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासने दिली.

मागण्या मान्य न झाल्यास कोरोना सर्वेवर बहिष्कार टाकण्याच्या आशा कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला किसान सभेचे डॉ अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, साहेबराव घोडे, खंडू वाकचौरे,  युवक संघटनेचे एकनाथ मेंगाळ, देवराम डोके व जनवादी महिला संघटनेच्या जुबेदा मणियार, सुमन इरणक यांनी पाठिंबा व्यक्त केला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting at tehsil office regarding survey of corona in Akole taluka