
व्यापाऱ्यांना कोणी खंडणी, हफ्ता मागत असेल, दादागिरी करीत असेल तर त्याची गय केली जाणार नाही.
राशीन (अहमदनगर) : व्यापाऱ्यांना कोणी खंडणी, हफ्ता मागत असेल, दादागिरी करीत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. व्यापाऱ्यांनी असा प्रकार कोणतेही दडपण न ठेवता पोलिसांना सांगावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.
सोमवारी (ता. 21) रात्री सिध्दटेक रस्त्यावरील सावतामाळी किराणा ॲण्ड बेकर्स दुकानातून तीन लाखांची चोरी झाल्यानंतर यादव यांनी व्यापाऱ्याची तातडीने बैठक बोलावली होती. यावेळी सरपंच निलम साळवे, उपसरपंच शंकर देशमुख, राम कानगुडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आजीनाथ मोढळे, प्रसाद मैड, ग्रामविकास अधिकारी कैलास तरटे, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे आदी उपस्थित होते.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी वाहतूक कोंडी, भाजीमंडई, दारूबंदी, मोकाट जनावरे, डबल ट्रॉलीची ऊस वाहतूक, त्यावरील कर्णकर्कश गाणी, दुचाकींना लावलेल्या एलईडी लाईट आदी समस्या माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कानगुडे, एन.एस.पाटील, सतीश मैड, गणेश कदम, मालोजी भिताडे, विनोद राऊत,अतुल साळवे यांनी मोठया पोटतिडकीने पोलिस निरीक्षक यादव यांच्यासमोर मांडल्या, त्यावर सर्वांच्या सहकार्यातून ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन यादव यांनी दिले.
यादव म्हणाले, व्यापारी आणि सराफा दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. राशीन पोलिस दूरक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या 36 गावांसाठी स्वतंत्र तीन बिट अंमलदारांची नेमणूक करण्यात येईल.
पोलिसांकडे यायला अवैध व्यावसायिकांची मदत नको....
उपसरपंच शंकर देशमुख म्हणाले, पोलिस स्टेशनला येण्यासाठी सर्वसामान्य माणसाला अवैध व्यावसायिकची मदत घेऊन यावे लागत होते ही परिस्थिती बदलली पाहिजे.त्यावर यादव यांनी अशी वेळ कोणावरही येणार नाही असे स्पष्ट केले.
संपादन : अशोक मुरुमकर