तब्बल सहा बिबट्यांचा हल्ला आणि एक आजीबाई, संगमनेरातील थरार; रात्री बाराला शेतकऱ्याचा वनमंत्र्याला फोन

At midnight, the farmer called the forest minister
At midnight, the farmer called the forest minister

संगमनेर ः पावसामुळे वाड्या- वस्त्यांवरील शेतकरी घरांत झोपले होते. भक्ष्याच्या शोधात एक-दोन नव्हे तर तब्बल सहा बिबटे निघाले होते. 

आंब्याच्या झाडावरून बंदिस्त गोठ्यात प्रवेश करून दोन शेळ्या ठार केल्या. जनावरांच्या ओरडण्यामुळे, काय झाले हे पाहण्यासाठी बाहेर आलेल्या एका वृद्धेवर बिबट्याने चाल केली. हा थरार घडला संगमनेर तालुक्‍याच्या पूर्व भागातील दाढ खुर्द येथील वाघमारे वस्तीवर शुक्रवारी (ता. 8) रात्री साडेअकराच्या सुमाराला. 

अधिक माहिती अशी ः दाढ खुर्द शिवारामध्ये शेतकरी नानाभाऊ वाघमारे यांच्या वस्तीवर, घराजवळ शेळ्यांसाठी तारेची भक्कम जाळी असलेला बंदिस्त गोठा बांधलेला आहे. त्याच्या वरच्या बाजूने असलेल्या फटीतून सहा बिबट्यांनी आत प्रवेश केला.

जनावरांच्या ओरडण्याने वाघमारे कुटुंबीय बाहेर आले, तेव्हा त्यांना बिबट्यांनी हल्ला केल्याचे दिसले. एकदाच तब्बल सहा बिबटे पाहून त्या कुटुंबाची भीतीने गाळण उडाली. दोन बिबटे घराच्या गेटजवळ, दोन मागील बाजूला, तर आंब्याच्या झाडाचा आधार घेत दोघांनी गोठ्यात प्रवेश केल्याचे त्यांना दिसले.

एक शेळी ठार करून त्यांनी बाहेर ओढून नेली होती. त्यांना हुसकावत पाळीव जनावरांच्या रक्षणासाठी वाघमारे यांनी आरडाओरडा केली. त्यांपैकी एका बिबट्याने बबई वाघमारे यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने पंजाच्या निसटत्या फटक्‍याने त्यांची केवळ साडी फाटली.

या घटनेची माहिती देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व संगमनेर वनविभाग-3 चे वनरक्षक सोनवणे व पठारे यांना फोन केला. मात्र, त्यांनी तो उचलला नाही, असे वाघमारे यांचे म्हणणे आहे. 


मंत्र्यांच्या फोननंतर यंत्रणेला जाग 
वनाधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याने नानाभाऊ वाघमारे यांनी थेट राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क केला. रात्री 12 च्या सुमारास वनमंत्र्यांनी त्यांची तक्रार ऐकून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आज पहाटे अडीचच्या सुमारास वन विभागाचे कर्मचारी दोन पिंजऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. या घटनेमुळे दहशतीखाली असलेल्या वाघमारे कुटुंबाला स्थानिक ग्रामस्थांनी मानसिक आधार दिला. 

बिबटे एक किंवा जोडीने शिकार करीत असल्याची माहिती आजवर झालेल्या अभ्यासातून समोर आली आहे. मात्र, या घटनेत चक्क सहा बिबटे हल्ला करण्यासाठी आल्याने, बिबट्यांच्या नैसर्गिक सवयी व वर्तनशैली परिस्थितीनुरूप बदलत आहेत का, याचा अधिक अभ्यास होण्याची आवश्‍यकता आहे. 
- मृणाल घोसाळकर, वन्यजीव अभ्यासक 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com