
नांदेडमध्ये प्रथमोचार केल्यानंतर मंत्री चव्हाण यांना ऍम्ब्युलन्सने मुंबईला पुढील उपचारासाठी नेण्यात आले. सकाळी अकरा वाजता ते नांदेडहून नगरमार्गे मुंबईकडे रवाना झाले. तिकडे जाताना ते काही काळ नगरमध्ये थांबले होते. कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांनी कौटुंबिक स्नेहामुळे त्यांच्यासाठी चहापानाची व्यवस्था केली
नगर ः सर्वसामान्य लोकांसह लेखक, अभिनेते आणि नेतेही कोरोनाने ग्रासले आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
नांदेडमध्ये प्रथमोचार केल्यानंतर मंत्री चव्हाण यांना ऍम्ब्युलन्सने मुंबईला पुढील उपचारासाठी नेण्यात आले. सकाळी अकरा वाजता ते नांदेडहून नगरमार्गे मुंबईकडे रवाना झाले. तिकडे जाताना ते काही काळ नगरमध्ये थांबले होते. कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांनी कौटुंबिक स्नेहामुळे त्यांच्यासाठी चहापानाची व्यवस्था केली.
केडगाव ओलांडल्यानंतर त्यांच्या वाहनाचा ताफा रस्त्याकडेला थांबला. देशमुख यांनी चहा व अल्पोपहार त्यांच्याकडे सुपूर्द केला. मंत्री चव्हाण यांनी सोशल डिस्टन्स ठेवून काळजी घेण्याची सूचना केली. देशमुख यांचे पुतणे व जिल्हा युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस हर्षवर्धन देशमुख तसेच मुकुल देशमुक हेही त्यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा - बेरोजगारी नो चिंता ः रोहित पवार मिळवून देणार नोकरी
चव्हाण म्हणाले, ""माझा गाडीचालक पॉझिटिव्ह आल्याने मी तपासणी करून घेतली होती. परंतु त्यावेळी मी निगेटिव्ह होतो. मात्र, आता दुसऱ्यांदा तपासणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह निघाली. मला सध्या कसलाही त्रास होत नाही. किंवा मी नैराश्यग्रस्तही नाही. केवळ खबरदारी म्हणून मुुंबईला उपचारासाठी चाललो आहे. मला काहीही झाले नाही.'' आपल्या आजाराविषयी सांगताना चव्हाण यांच्या चेहऱ्यावर कसलीही चिंता नव्हती.
उलट त्यांनी विनायक देशमुख यांच्याकडून नगर जिल्ह्यातील कोरोना स्थितीविषयी माहिती घेतली. जिल्ह्यात किती रूग्ण आहेत. त्यांची तपासणी कोठे होते. शेजारील औरंगाबाद, नाशिकमध्ये काय स्थिती आहे. नगरमध्ये कशी उपाययोजना केली आहे, अशा एक ना अनेक प्रश्नांद्वारे त्यांनी जिल्हयाचा आढावा घेतला.
कौटुंबिक स्नेहापोटी त्यांनी देशमुख यांचे चहापान घेतले. त्यानंतर लगेच ते पुढील प्रवासाला निघाले. मात्र, जाताना त्यांनी नगरकरांना व देशमुख यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. स्वतः आजारी असताना जनतेची काळजी करण्याच्या त्यांच्या या स्वभावामुळे सर्वांनाच कौतुक वाटले.