मंत्री गडाख यांचे नेवाशाला तीन कोटींचे "दसरा गिफ्ट"

सुनील गर्जे
Saturday, 24 October 2020

नेवासे शहराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने तीन कोटी रुपयांचा  निधी मंजूर केल्याची माहिती मंत्री  गडाख यांनी दसऱ्याच्या पूर्वसमध्येला 'पत्रकार परिषदेत' दिली.

नेवासे : ऐन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासे शहराच्या विकासासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करत नेवासेकारांना शहर विकासाचे  'दसरा गिफ्ट' दिले आहे. नेवासे शहरवशीयांनी हा भरीव निधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत मंत्री गडाखांचे आभार मानले आहे. 

नेवासे शहराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने तीन कोटी रुपयांचा  निधी मंजूर केल्याची माहिती मंत्री  गडाख यांनी दसऱ्याच्या पूर्वसमध्येला 'पत्रकार परिषदेत' दिली.  

मंत्री गडाख म्हणाले,"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेवासे शहरातील विकासाची प्रक्रिया थांबू नये यासाठी आपण शासन दरबारी ७ कोटी ८९ लाख ४२ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली होती. पैकी त्यांच्या प्रयत्नांनी पहिल्या टप्प्यात तब्बल तीन कोटींचा भरीव निधी उपलब्ध झाल्याने मंजूर निधीतून नेवासे शहरातील विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.

नेवासे शहरातील नागरिकांना या निधीतून पायाभूत सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी उर्वरित निधी देखील लवकरच मंजूर होणार आहे. येणाऱ्या काळातही विविध योजने अंतर्गत शहरासाठी जास्तीतजास्त निधी आणण्यात येणार आहे. त्यासाठी शासन दरबारी शहर विकासाचे अनेक प्रस्ताव देखील सादर करण्यात आल्याचीही माहीती मंत्री गडाख यांनी दिली. 

ही विकासकामे लागणार मार्गी
नेवासे शहरातील पालखी मार्ग,काशी विश्वेश्वर मंदिर येथे सुशोभिकरण, गणपती घाट सुशोभिकरण, मारुती मंदिर ते डॉ. कानडे ते डॉ. शिंदे घर तसेच मिटकरे ते पिंटू परदेशी घर व दाणे घर ते ओम शांती केंद्र आणि ज्ञानेश्वर मंदिर ते आप्पा इरले घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे. काटे महाराज आश्रम ते सेंट मेरी वस्तीगृहपर्यंत तसेच ज्ञानोदय विद्यालय ते बीएसएनएल ऑफिस ते खंडागळे हॉस्पिटल रस्ता डांबरीकरण , लक्ष्मीआई मंदिर सुशोभीकरण अशी कामे होणार आहेत.

संपादन - अशोक निंबाळकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Gadakh gives Rs 3 crore "Dussehra gift" to Nevasa