esakal | दडवलेल्या कोरोना मृत्यूच्या आकड्यांची होणार चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

हसन मुश्रीफ

दडवलेल्या कोरोना मृत्यूच्या आकड्यांची होणार चौकशी

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक चांगलीच गाजली. स्थानिक अधिकाऱ्यांचे अनेकांनी कौतुक केले, तर काहींनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. मृत्यूच्या आकड्यांत प्रशासनाने फसवेगिरी केल्याचेही आरोप झाले. गंभीर विषयावरील चर्चेत "कुकडी'च्या पाण्याचे राजकारणही रंगले अन्‌ शेवटी मुश्रीफ यांनीच चिमटे काढत वाळूचा बेकायदा उपसा आणि दडपलेच्या मृत्यूंच्या आरोपाच्या चौकशीचे आदेश दिले.

शहरातील तुळशीदास मंगल कार्यालयात आढावा बैठक झाली. आमदार बबनराव पाचपुते, घनश्‍याम शेलार, राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, राजेंद्र क्षीरसागर, अण्णा शेलार, दीपक भोसले, हरिदास शिर्के, बाळासाहेब नाहाटा, स्मितल वाबळे उपस्थित होते.

(Minister Hassan Mushrif orders probe into sand thieves)

हेही वाचा: वाडीतली पोरं सगळ्यात म्होरं ः १६ फौजदार, १४ क्लासवन अधिकारी

प्रारंभी प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांनी कोरोनाचा आढावा घेतला. त्यावर राजेंद्र म्हस्के यांनी, "मृत्यूदर अधिकारी दडवीत आहेत. मोठ्या प्रमाणात माणसे मरत असताना प्रशासन खरी संख्या दाखवीत नाही,' असा गंभीर आरोप केला. तसेच, नदीपट्ट्यातील गावांत ग्रामस्थांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याची मागणी केली.

नाहाटा यांनी प्रशासनाची लक्तरेच वेशीवर टांगली. प्रांताधिकारी व तहसीलदारांचे काम असमाधानकारक असून, त्यांच्या चौकशीची मागणी केली. खासगी कोविड सेंटर नसते तर या अधिकाऱ्यांना जनतेने स्वस्थ बसू दिले नसते, असा हल्ला चढविला. "कुकडी'च्या पाण्याचा मुद्दाही बैठकीत चांगलाच गाजला. शेतीला पाण्याची गरज आहे; मात्र पाणी वेळेवर मिळत नसल्याने पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी झाली.

आमदार पाचपुते यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक करतानाच, "कोरोना संकटात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. प्रशासन त्याची आकडेवारी कमी दाखवीत असून, नाहाटा यांच्या आरोपांची दखल घ्यावी,' असे सुचविले. तालुक्‍यात आता पाण्यावर बोलणाऱ्यांची आणि काम करणाऱ्यांची संख्या वाढल्याने आपला ताण कमी झाल्याचा चिमटाही त्यांनी काढला. घनश्‍याम शेलार यांनी पालकमंत्र्यांचे कौतुक करताना तालुक्‍यातील सुविधांना त्यांनी तातडीने झुकते माप दिल्याचा उल्लेख केला. जिल्हाधिकारी भोसले यांनीही पालकमंत्र्यांची स्तुती केली.

पालकमंत्र्यांचे चिमटे आणि आदेश

मुश्रीफ म्हणाले, ""कोरोनाची पहिली लाट संपली. नंतर लग्नसमारंभ, निवडणुका, विविध कार्यक्रम घेत उन्माद केला. त्यामुळे तिसरी लाट जोरात येण्याची चाहूल आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेतील चुका तिसऱ्या लाटेत करून जमणार नाही. "कुकडी'च्या आवर्तनाबाबत आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करणार आहे. कोरोनातील मृत्यू दडविल्याच्या आरोपांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करू.''

उपस्थितांची नावे वाचताना भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांचे नाव येताच मंत्री मुश्रीफ मिस्कीलपणे म्हणाले, ""शिवाजीराव नागवडे आमचे नेते व मित्र होते. त्यांचा मुलगा भाजपमध्ये कसा गेला, असे मी आत्ताच विचारले.'' त्यावर, संदीप हे त्यांच्या भावकीतील आहेत, असे सांगण्यात आल्याचे सांगून काढलेला चिमटा उपस्थितांची दाद देऊन गेला.

पालकमंत्र्यांकडून वाळूचोरीची दखल

कोरोना संकटात सामान्यांना घराबाहेरही पडू न देणारे प्रशासन नदीपात्रात वाळूउपसा करणाऱ्या जत्रेकडे दुर्लक्ष करतेच; शिवाय कारवाईसाठी मुक्कामी थांबणारे तहसीलदार हात हलवीत मागे येतात. वाळूतस्करांच्या पाठीशी कोण वरिष्ठ अधिकारी आहेत, या पत्रकारांच्या प्रश्‍नावर मंत्री मुश्रीफ आश्‍चर्यचकित झाले. लिलाव असतानाच वाळूउपसा होता. येथे उलटे असले, तर आपण याची चौकशी करू, असे स्पष्ट केले.(Minister Hassan Mushrif orders probe into sand thieves)