esakal | वाडीतली पोरं सगळ्यात म्होरं ः १६ फौजदार, १४ क्लासवन अधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

आव्हाडवाडीत फौजदाराचं गाव

वाडीतली पोरं सगळ्यात म्होरं ः १६ फौजदार, १४ क्लासवन अधिकारी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

तिसगाव : नगर तालुक्‍यातील गर्भगिरी डोंगराच्या कुशीत पांढरीपूल-करंजी रस्त्यावर असलेलं छोटसं गाव म्हणजे आव्हाडवाडी. जेमतेम 700 ते 800 लोकसंख्या असलेल्या या गावाने "फौजदारांचे गाव' ही आपली नवी ओळख महाराष्ट्रात निर्माण केली आहे. गावातील 16 जण फौजदार आहेत. महाराष्ट्र व केंद्रीय शासकीय सेवेत वर्ग-1 अधिकारी म्हणून 14 जण सेवेत आहेत. २७जण पोलिस दलात अंमलदार आहेत.

गाव तसे दुष्काळी. अल्प प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतीतून अत्यल्प उत्पन्न मिळते. त्यामुळे येथील मुलांसमोर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. नगर शहर जेमतेम 25 किलोमीटर अंतरावर असल्याने, येथील सर्व तरुण शिक्षणासाठी धडपडत आहेत. शासकीय सेवेत जाण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत.

सुरवातीला गावातील पहिले प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्ञानदेव आव्हाड हे विक्रीकर आयुक्त म्हणून शासकीय सेवेत दाखल झाले. त्यानंतर विक्रम आव्हाड जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून, धर्मनाथ आव्हाड विक्रीकर आयुक्त, लक्ष्मण आव्हाड, रामकृष्ण आव्हाड, बाबाजी आव्हाड हे पोलिस उपअधीक्षक, महादेव आव्हाड, प्रा. लक्ष्मण आव्हाड वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी रुजू झाले. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून गावातील तरुणांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.

हेही वाचा: तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन

सध्या गावातील 27पेक्षा जास्त तरुण पोलिस अंमलदार म्हणून महाराष्ट्रात विविध ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. तसेच विविध शासकीय कार्यालयांतही अनेक तरुण नोकरी करीत आहेत. शासकीय सेवेत असलेल्या तरुणांनी एकत्र येत गावात अत्याधुनिक वाचनालय सुरू केले आहे. गावातील ज्येष्ठ मंडळी स्वेच्छेने वाचनालयासाठी योगदान देत आहेत. 80 टक्के लोक वारकरी संप्रदायाला मानणारे असल्याने, गावात अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यातही गाव आघाडीवर असते, असे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत आंधळे यांनी सांगितले.

आजूबाजूची सर्व गावे आज आमच्या गावाकडे आदर्श गाव म्हणून पाहत आहेत. कित्येक तरुण आमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करून, कष्टाशिवाय पर्याय नसल्याची जाणीव करून देतो.

- प्रशांत आंधळे, सहायक पोलिस निरीक्षक, ठाणे

गावातील तरुण स्वकर्तृत्वावर मोठे झाल्यानंतरही गावाला विसरलेले नाहीत. गावाच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर असतात. यात्रा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांत आनंदाने सहभागी होतात. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

- अंकुश आव्हाड, सरपंच, आव्हाडवाडी