पुणे विद्यापीठाच्या गोंधळाबाबत मंत्र्यांचा खुलासा, विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

विलास कुलकर्णी
Saturday, 17 October 2020

काही अभ्यासक्रमांचे, काही विषयांचे पेपर रद्द झाले. दिवसभर महाविद्यालयात बसून, काही विद्यार्थ्यांना परीक्षा न देता माघारी परतावे लागले. अशा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झाला,'' असे ते म्हणाले. 

राहुरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षेत गोंधळ झाला.

विद्यार्थ्यांना झालेल्या मानसिक त्रासाची जाणीव आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. 

राहुरी फॅक्‍टरी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले, ""कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मागील सत्रांत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला.

ज्यांना गुणवाढीसाठी परीक्षा द्यायची असेल, त्यांची परीक्षा लॉकडाऊन उठल्यावर घेण्याची तयारी होती; मात्र, त्यास यूजीसीने मान्यता दिली नाही. काही जण न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे या परीक्षा घ्याव्या लागल्या.'' 

""परीक्षांचे नियंत्रण विद्यापीठांकडे असते. राज्य सरकार फक्त मार्गदर्शन करते. विविध अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षेत सलग दोन दिवस गोंधळ उडाला. काही अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या वेळेत महाविद्यालयांत पोचल्या नाहीत. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडविल्या नाहीत.

काही अभ्यासक्रमांचे, काही विषयांचे पेपर रद्द झाले. दिवसभर महाविद्यालयात बसून, काही विद्यार्थ्यांना परीक्षा न देता माघारी परतावे लागले. अशा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झाला,'' असे ते म्हणाले. 
"सकाळ'मधील बातम्यांमुळे वस्तूनिष्ठ माहिती समजल्याचे सांगून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. त्यांना पुन्हा पेपरची संधी दिली जाईल. कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले. या वेळी सुरेश वाबळे, काका कोयटे, शिवाजी कपाळे, नामदेव ढोकणे, श्‍यामराव निमसे, डी. बी. जगताप, सुरेंद्र थोरात आदी उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister reassures students about Pune University exams