भाजपातून राष्ट्रवादीत येण्यासाठी दिग्गजांची रांग; मंत्री तनपुरेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळ अलर्ट

अशोक निंबाळकर
Tuesday, 3 November 2020

आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी दुसऱ्या पक्षातील नेत्यांची रांग लागली आहे. सर्वाधिक इन्कमिंग भाजपातून आहे. नगर जिल्ह्यात भाजपमध्ये मोठा असंतोष आहे. आगामी काळात त्यांचे कार्यकर्तेच काय नेतेही राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतलेले दिसतील.

नगर ः मराठीत असं म्हणतात की, गृह फिरले की घराचे वासेही फिरतात. राजकारणातही भाजपसोबत तसंच झालं आहे. राज्यातील सरकार गेल्याने नेत्यांसह कार्यकर्तेही नाराज आहेत. दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर भाजपमध्ये गळती सुरू झाली आहे. भाजपात आउटगोईंग तर राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरू झालं आहे.

राज्यातील सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार कोणत्याही वेळी कोसळेल, असा दावा केला जात आहे. मात्र, राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे नगरच्या तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी दुसऱ्या पक्षातील नेत्यांची रांग लागली आहे. सर्वाधिक इन्कमिंग भाजपातून आहे. नगर जिल्ह्यात भाजपमध्ये मोठा असंतोष आहे. आगामी काळात त्यांचे कार्यकर्तेच काय नेतेही राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतलेले दिसतील.

श्रीरामपूर तालुक्यात तर दुफळी झाली आहे. तेथील भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 जणांनी राजीनामा देत पक्षनेतृत्वाच्या मनमानीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाचे उत्तरेतील जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

जळगाव जिल्ह्यात तर रोजच भाजपचे कार्यकर्ते आणि नेते राष्ट्रवादीत डेरेदाखल होत आहेत. राज्यातील अनेक दिग्गज राष्ट्रवादीत येण्यासाठी उतावीळ झाले आहेत. आम्ही त्यांंना योग्य वेळी प्रवेश देणार असल्याचेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

सध्या तनपुरे यांचा पाथर्डी तालुक्यात दौरा सुरू आहे. या दौऱ्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी तनपुरे यांची भेट घेत राष्ट्रवादीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. जिल्ह्याच्या दोन्ही भागात हे सुरू  आहे. राज्यातील भाजपचे कोणते नेते संपर्कात आहेत, याची चर्चा तनपुरे यांच्या या वक्तव्याने सुरू झाली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Tanpur claims that BJP leaders are eager to join NCP