esakal | मंत्री थोरात फडणवीसांवर बरसले ः काँग्रेस गुपकरमध्ये नाही, मुफ्तींसोबत जाऊन तुम्हीच देशप्रेम गुंडाळले
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Thorat criticizes Fadnavis

महेबूबा मुफ्तींसोबत काश्मीरची सत्ता उपभोगताना भाजपने आपले देशप्रेम खुंटीला टांगून ठेवले होते का? असा संतप्त सवाल थोरात यांनी केला.

मंत्री थोरात फडणवीसांवर बरसले ः काँग्रेस गुपकरमध्ये नाही, मुफ्तींसोबत जाऊन तुम्हीच देशप्रेम गुंडाळले

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः सातत्याने खोटे बोलून जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करण्याच्या सवयीमुळे राज्यातील जनतेने भाजपला सत्तेवरुन दूर केले. मात्र, भाजप नेत्यांची खोटे बोलण्याची सवय गेली नाही. याच सवयीला जागून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काश्मीरबद्दल बोलताना, पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, विरोधीपक्ष नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी असल्याचे खोटे विधान केले आहे. काँग्रेस पक्षाचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नाही. मात्र, फडणवीस यांना काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी असल्याचा साक्षात्कार झाला व त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका करण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसवर आरोप करण्याचा नादात आपण खोटे बोलत आहोत, याचे भानही त्यांना राहिले नाही. बोलण्याच्या अगोदर त्यांनी जरा माहिती घेतली असती तर बरे झाले असते, असेही थोरात म्हणाले. काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्याची लढाई लढली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे.

इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. देशप्रेम हे काँग्रेसच्या नसानसात आहे. महेबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात केलेल्या विधानाचा, 52 वर्ष आपल्या मुख्यालयात तिरंगा न फडकवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक फडणवीस आता विलाप करीत आहेत. परंतु 2017 साली याच महेबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केले होते, त्यावेळेला भाजप त्यांच्याबरोबर सत्तेत होता. काँग्रेसने यासंदर्भात त्यांचा राजीनामा मागितला होता. तेव्हा मात्र भाजप सत्तेला चिकटून बसली होती. हेच त्यांचे स्ट्रॅटेजीक अलायन्स होते का?

महेबूबा मुफ्तींसोबत काश्मीरची सत्ता उपभोगताना भाजपने आपले देशप्रेम खुंटीला टांगून ठेवले होते का? असा संतप्त सवाल थोरात यांनी केला. काश्मीरमध्ये लोकशाही अस्तित्वात रहावी आणि भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर यावा यासाठी काँग्रेस पक्ष तेथील निवडणुकांमध्ये सहभागी झाला आहे. त्याचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नसल्याचे थोरात म्हणाले.
अहमदनगर

loading image