कोपरगावच्या पाणी प्रश्‍नासाठी आमदार काळे यांचा १०५ कोटीचा नवा प्रस्ताव

मनोज जोशी
Wednesday, 30 December 2020

कोपरगाव शहराच्या पाचवीला पूजलेली पाणीटंचाई नव्या वर्षात कायमची दूर करू. महाविकास आघाडी सरकार आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.

कोपरगाव (अहमदनगर) : कोपरगाव शहराच्या पाचवीला पूजलेली पाणीटंचाई नव्या वर्षात कायमची दूर करू. महाविकास आघाडी सरकार आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. पालिकेच्या पाणीयोजनेची साठवण क्षमता वाढविण्यासाठी 105 कोटींचा नवा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. 

नगरपालिकेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ काळे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्ष विजय वहाडणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते विरेन बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे, मेहमुद सय्यद, संदीप पगारे, नगरसेविका प्रतीभा शिलेदार, वर्षा शिंगाडे, उद्योजक कैलास ठोळे आदी उपस्थित होते. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काळे म्हणाले, ""नवीन पाच क्रमांक साठवण तलावाचे 30 टक्के काम झाले. उर्वरित 70 टक्के तलावाचे काम व शहरातील वाढीव पाइपलाइनच्या कामाकरिता 105 कोटी रुपये निधीची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे हा प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे.

पालिका निवडणुकीत आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला, तरी वहाडणे यांना शहरविकासासाठी सतत सहकार्य केले. आपण माझ्यावर दाखविलेल्या विश्वासातून कोपरगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. पाणीटंचाई कायमची दूर करीन.'' 

नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, की आशुतोष काळे हे आमदार झाल्यापासून नव्हे, तर मी नगराध्यक्ष झालो, तेव्हापासून शहराच्या विकासकामात पूर्ण सहकार्य करीत आहेत. त्यामुळेच गेल्या 10 वर्षांत झाली नसतील, त्यापेक्षा अधिक कामे 4 वर्षांत झाली. निवडणुकीत राजकारण करा, मात्र शहरविकासात राजकारण नको. शहराच्या विकासात खीळ घालणाऱ्यांना कोपरगावच्या जनतेने खड्यासारखे दूर केले. विकासाची दूरदृष्टी असलेल्या आमदार आशुतोष काळे यांना निवडून दिले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Ashutosh Kale new proposal of Rs 105 crore for Kopargaon water issue