नगरच्या लॉकडाउनबाबत आमदार जगताप, महापौरच निर्णय घेणार, पालकमंत्र्यांची मोकळीक

सूर्यकांत वरकड
Thursday, 17 September 2020

आता केंद्र सरकारने लॉकडाऊन करायचे नाही, हा निर्णय घेतल्यामुळे प्रशासन यामध्ये भाग घेणार नाही. मात्र, सर्व जनता मिळून बंद करणार असेल, तर प्रशासन सहकार्य करेल.

नगर ः केंद्र सरकारने आर्थिक कारणांमुळे लॉकडाउन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शासन लॉकडाउन करणार नाही. मात्र, स्थानिक पातळीवरील नेत्यांनी जनता कर्फ्यूचा निर्णय घ्यावा. नगर शहरातील जनता कर्फ्यूचा निर्णय आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घ्यावा, असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जिल्ह्यातील कोरोनाविषयक कामांची आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते. 

के.के. रेंजबाबत काय म्हणाले

मुश्रीफ म्हणाले, के. के. रेंज जमीन अधिग्रहणाबाबत जिल्ह्यातील जनतेचे जे मत असेल तेच माझे मत आहे. मी तुमचा हमाल आहे. याबाबत सर्व नेतेमंडळी एकत्र असतील तर आपल्याला मोठा लढा उभारावा लागेल. संरक्षण विभागाने के. के. रेंज जमीन अधिग्रहण करायचे ही भूमिका घेतली असेल तर आपल्याला एकत्र येऊन लढावे लागेल. यासंदर्भात पुढच्या वेळी मी बैठक बोलवेल. 

जनता कर्फ्युचं असं होते

स्थानिक स्तरावर जनता कर्फ्यू पुकारला जाऊ शकतो. त्यासाठी मी महापौरांना सांगितले आहे की, त्यांनी सर्व लोकांना एकत्र करून याबाबत निर्णय घ्यावा. मी माझ्या मतदारसंघात जनता कर्फ्यू केला होता. पण त्यात एक अडचण अशी आहे की, बंद करणार म्हटले की एक दिवस अगोदर व बंद पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी नागरिकांची बाजारात गर्दी होती. त्यामुळे आपण जे दहा दिवसांत घरात राहून कमवायचे ते एका दिवसांत घालवायचे, अशी परिस्थिती होते.

विरोध होतोच तेव्हा...

आता केंद्र सरकारने लॉकडाऊन करायचे नाही, हा निर्णय घेतल्यामुळे प्रशासन यामध्ये भाग घेणार नाही. मात्र, सर्व जनता मिळून बंद करणार असेल, तर प्रशासन सहकार्य करेल. कोल्हापूर येथे जेव्हा जनता कर्फ्यू बाबत बैठक झाली, तेव्हा 50 टक्के लोकांनी विरोध केला, मतभेद झाले. त्यामुळे असा निर्णय घेताना एकत्र बसून घ्या. तुमचा जो निर्णय असेल त्याला पालकमंत्री म्हणून माझे सहकार्य असेल,' असेही त्यांनी स्पष्ट केले. 

संपादन - अशोक निंबाळकर
.......... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Jagtap, the mayor will take the decision regarding the lockdown of the nagar