अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा सेविकांची व्यथा आमदार लंकेंनी मांडली मुख्यमंत्र्यांकडे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

अंगणवाडी सेविकांवर सध्या नियमित लाभार्थी व बाहेरगावाहून आलेले प्रवाशी यांना पोषण आहार देण्याची जबाबदारी आहे. तसेच आशा सेविकांना बाहेरगावाहून आलेल्या लोकांच्या नोंदी ठेवणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे आदी कामे आपले जीव धोक्यात घालून करावी लागतात.

पारनेर ः कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व प्रशासनाचा त्या विरोधात सुरू असलेला रात्रंदिवस लढा याचा विचार करता जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहे. परंतु अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच आशा सेविका यांच्यावर कामाचा अधिक बोजा पडत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा बोजा कमी केला पाहिजे. त्यांची काही कामे इतर कर्माचाऱ्यांना द्यावीत, अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून केली आहे.

अंगणवाडी सेविकांवर सध्या नियमित लाभार्थी व बाहेरगावाहून आलेले प्रवाशी यांना पोषण आहार देण्याची जबाबदारी आहे. तसेच आशा सेविकांना बाहेरगावाहून आलेल्या लोकांच्या नोंदी ठेवणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे आदी कामे आपले जीव धोक्यात घालून करावी लागतात.

हेही वाचा - नगरकरांची काळजी वाढवणारी बातमी, संगमनेरात कोरोनाबाधित

याच कर्मचा-यांना सारीचा सर्वे करण्याचे काम दिले आहे. त्यासाठी प्रत्येक घरी अनेकदा फे-या माराव्या लागतात. सध्या अंगणवाडी सेविकांना व आशा सेविकांना निगराणी केंद्रावर थांबावे लागत आहे. या सर्व महिला आहेत, त्यांना काम करताना मर्यादा येतात. या संकटात त्यांना स्वतःबरोबरच कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. त्या मुळे ही सर्व कामे अंगणवाडी सेविका व मदतनिस तसेच आशा सेविका यांच्यावर न लादता इतर सरकारी कर्मचा-यांना द्यावीत असी मागमी पत्राद्वारे लंके यांनी केली आहे. 

अनेक ठिकाणी केवळ अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्यावर कामे सोपवली आहेत तर काही ठिकाणी ठराविक प्राथमिक शिक्षकांना सक्ती केली आहे. असे न करता सर्व विभागांना व सर्व कर्मचाऱ्यांना ही कामे विभागून दिली जावीत, असेही पत्रात म्हटले आहे. त्या साठी गर्भवती तसेच ज्यांना एक वर्षाच्या आतील लहान मुले आहेत त्यांना कामाचे वाटप करताना सवलत देणे गरजेचे आहे अशा अाशयाचे पत्र आमदार लंके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी यांनी पाठविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Lanke demands concession in work for Anganwadi workers