मला मुंबई कळेल का म्हणणाऱ्यांना पारनेरही समजलं नाही, लंकेंचा औटींना टोमणा

मार्तंड बुचुडे
Friday, 13 November 2020

थेट प्रशासक नेमण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, "तुम्ही आमच्या दूध संघात लक्ष घालू नका,' असे सांगितले. नंतर प्रशासक आले. मी एखाद्या कामात लक्ष घातले, तर ते काम पूर्ण केल्याशिवाय बाजूला होत नाही.''

पारनेर ः ""मुंबई याला कळेल का, अशी टीका करणाऱ्यांना साधे पारनेर कळले नाही. मी वर्षात तालुक्‍यात एवढा निधी आणला. त्यांनी 15 वर्षे काय केले, याचे संशोधन करावे. मी आमदार असतो, तर पारनेर साखर कारखान्याची विक्री होऊ दिली नसती. शेतकरीहितासाठी दूध संघ चांगल्या पद्धतीने चालवून दाखवू,'' असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. 

पारनेर तालुका दूध संघातर्फे दूध संस्थांना त्यांच्या सुमारे 40 लाख रुपयांच्या ठेवींचे वितरण करण्यात आले. त्या वेळी लंके बोलत होते. संघाचे नूतन प्रशासकीय अध्यक्ष दादासाहेब पठारे, सदस्य संभाजी रोहकले, सुरेश थोरात, वसंत सालके, गंगाराम बेलकर, शशिकांत देशमुख, सरपंच राजू शेख, गणेश शेळके, उत्तम गवळी, सचिन पठारे, सचिन काळे आदी उपस्थित होते. 

लंके म्हणाले, ""संघ चालविण्यासाठी दूरदृष्टी असणारा नेता हवा होता, तो आता मिळाला आहे. येथे चांगल्या विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन संघ ऊर्जितावस्थेत आणावा. मी पाहिजे ते सहकार्य करीन. नारायणगव्हाण येथील संघाच्या जागेची नोंद होण्यासाठी मदत करीन. फक्त संघाच्या आवारात राजकारण आणू नका. दूध संघात राजकारण सुरू झाल्याने मी संघात लक्ष घातले.

थेट प्रशासक नेमण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, "तुम्ही आमच्या दूध संघात लक्ष घालू नका,' असे सांगितले. नंतर प्रशासक आले. मी एखाद्या कामात लक्ष घातले, तर ते काम पूर्ण केल्याशिवाय बाजूला होत नाही.'' 
अध्यक्ष पठारे म्हणाले, ""संघाची अवस्था खूप वाईट झाली आहे. मात्र, पुढील वर्षभरात संघाचे एक लाख लिटर दूधसंकलन करण्याचा मानस आहे. तसेच, 50 गावांत दूध संस्थेला बल्क कुलर देणार आहोत.'' 

कुंपणाने शेत खाल्ले 
""दूध संघातील अनेक प्रकारचे साहित्य चोरीस गेले आहे. मात्र, ज्यांची सत्ता होती, त्यांनी पोलिसांत साधी तक्रारही दिली नाही. चोरीला गेलेल्या यंत्रसामग्रीची फिर्याद नाही, याचा अर्थ कुंपणानेच शेत खाल्ले. आम्ही त्याचा शोध घेणार आहोत. त्यांना मोकळे सोडणार नाही,'' असे सदस्य संभाजी रोहकले यांनी सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Nilesh Lanka criticizes Vijay Auti ahmednagar news