
विखे म्हणाले, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या पदभार सोहळ्याला गर्दी चालते आणि शिवजयंतीला नाही, हा काय प्रकार आहे? ज्यांचे नाव घेऊन सत्तेत आलात, त्यांच्या जयंतीसाठी नियमावली का करता? महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीने ही अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारी बाब आहे.
शिर्डी (अहमदनगर) : महाविकास आघाडी सरकारची शिवजयंती नियमावली महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोचविणारी आहे. ती तातडीने मागे घ्यावी. वीजजोड तोडून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळू नका. सिनेअभिनेत्रीच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या मंत्र्याला पाठीशी घालू नका, अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
विखे म्हणाले, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या पदभार सोहळ्याला गर्दी चालते आणि शिवजयंतीला नाही, हा काय प्रकार आहे? ज्यांचे नाव घेऊन सत्तेत आलात, त्यांच्या जयंतीसाठी नियमावली का करता? महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीने ही अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारी बाब आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांचे वीजजोड तोडता. शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कॉंग्रेसचे अस्तित्व या सरकारमध्ये दिसत नाही. त्यांच्या इशाऱ्यांना किंमत दिली जात नाही. त्यांनी इशारे देणे बंद करावे.
लाचारी पत्करून सरकारमध्ये राहण्याची वेळ कॉंग्रेस पक्षावर आली आहे. हिंमत असेल तर त्यांनी बाहेर पडून दाखवावे. अभिनेत्री पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येबाबत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याचे नाव समोर आले आहे. त्याच्या ऑडिओ क्लिप राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे भारतीय जनता पक्षाने दिल्या आहेत. अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवता? त्यांचे समर्थन करणेही अशोभनीय आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेत राहण्यासाठी किती तडजोडी करायच्या, हे आता ठरविले पाहिजे, असे मत विखे यांनी व्यक्त केले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जोर्व्याचे सरपंच रवींद्र खैरे मनापासून आमच्याबरोबर होते. काहींनी दहशत निर्माण करून त्यांना स्वत:कडे ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, असे ते म्हणाले.