आमदार रोहित पवारांनी कुकडीचा शब्द पाळला...सहाचा मुहूर्त नाही टळला

kukadi canal
kukadi canal

कर्जत : कुकडीचे नियोजित उन्हाळी आवर्तन (दि.६ रोजी) सोडण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा उन्हाळी आवर्तनाचा लाभ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कुकडीच्या पाण्यावर चांगलेच राजकारण तापले होते. मात्र, ठरल्या वेळेतच कुकडीचे दुबार आवर्तन सुटल्याने सर्वच चर्चांवर विरजन पडले.

हे आवर्तन सहा तारखेला सुटूच शकत नाही, असा दावा भाजपचे आमदार बबनराव पाचपुते व माजी मंत्री राम शिंदे करीत होते. मात्र, तो सहा तारखेचा मुहूर्त साधल्याने खोटा ठरला आहे. त्यांचे आंदोलन केवळ श्रेयासाठीच होतं, असं पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा टोला, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी लगावला आहे. पाणी गळती रोखली पाहिजे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे,असेही ते म्हणाले.

कर्जतसाठी आमदार रोहित पवार तर श्रीगोंदा तालुक्यासाठी माजी आमदार राहुल जगताप व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार कुकडी प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या तालुक्यांना आपल्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा करत आहेत. कोणावर अन्याय होऊ नये आणि सर्व तालुक्यांना आपल्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांनी आपली वेळोवेळी भूमिका मांडली होती.

कुकडीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तन हे प्रथमतःच दुसऱ्यांदा सुटले आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक खलील अन्सारी, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ तसेच सबंधित अधिकारी पदाधिकारी व आ. रोहित पवार, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या उपस्थितीत (दि.२९ मे रोजी) झालेल्या नियोजित बैठकीत (दि.६ रोजी) आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी घेतला होता.

ठरल्याप्रमाणे नियोजित वेळेत कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे आमदार रोहित पवारांनी कर्जतच्या शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला. शेतकऱ्यांनीदेखील पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे अाहे. या पाण्याची चोरी होऊ नये यासाठी ज्या त्या भागातील शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कुणीही अवैधरित्या चाऱ्या फोडल्यास अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पहिल्यांदाच मिळणार दुबार उन्हाळी आवर्तन
मागील काही दिवसांपासून कुकडीच्या पाण्यावर चांगलेच राजकारण तापले होते. कुकडीच्या आवर्तनाबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेऊन वेळोवेळी न्याय देण्याचा प्रयत्न केला. इतिहासात पहिल्यांदाच कुकडीचे दुबार उन्हाळी आवर्तन शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. दुबार उन्हाळी आवर्तनाचे सर्व श्रेय जलसंपदामंत्री जयंत पाटील,कुकडीचे सर्व अधिकारी व पाठपुरावा करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींना जाते.

माजी पालकमंत्र्यांची स्टंटबाजी

कुकडीचे आवर्तन सहा जूनला सोडण्यात येणार आहे, असे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर चौंडी येथील कार्यक्रमात राम शिंदे यांची भेट घेत पवार यांनी पाणी येत असल्याचे सांगितले होते. तरीही माजी पालकमंत्री राम शिंदे व बबनराव पाचपुते यांनी उपोषण केलं. काही वेळातच अधिकाऱ्यांकडून आश्वासन घेत त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी स्टंटबाजी म्हणत हिणवले होते. सहा तारीख ही घाईघाईत जाहीर केली आहे. या तारखेला पाणी सुटूच शकत नाही, असा दावा विरोधक करीत होते. परंतु पाणी सुटल्याने त्यांची तोंडे बंद होतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com