esakal | आमदार रोहित पवार म्हणाले, धन्यवाद ताई! आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरुर शिकावा
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rohit Pawar thanked Pankaja Munde

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. कोरोना काळातही त्यांनी केलेल्या कामाची मुंडे यांनी प्रशांसा केली आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, धन्यवाद ताई! आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरुर शिकावा

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. कोरोना काळातही त्यांनी केलेल्या कामाची मुंडे यांनी प्रशांसा केली आहे. त्यांच्या या मनाच्या मोठेपणाबद्दल कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी धन्यवाद मानले आहेत.

ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नाबद्दल मंगळवारी पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात काही महत्त्वाचे निर्णय झाले. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवार यांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्टिटमध्ये म्हटलं आहे की, hats off ... कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले ... पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत मुंडे यांचे धन्यवाद मानले आहेत. 

आमदार रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा.

राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक झाली. ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला. कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. साखर कारखान्यांशी दरवाढीसंदर्भातील तीन वर्षांचा करार करण्यात येईल. तसेच मुकादमांचे कमिशन १९ टक्के करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ऊसतोड कामगार संघटनांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून कामगार आता कारखान्यांवर रूजू होतील, असं शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर म्हटलं आहे.

या बैठकीदरम्यान स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाद्वारे ऊसतोड कामगारांच्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करण्यात आले. महामंडळ नोंदणी लवकर पूर्ण करून डिसेंबरपासून महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत निर्देश देण्यात आले, असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ऊसतोड कामगारांची नोंदणी, साखर कारखाने तसेच ऊसतोड कामगारांसाठी नवीन योजना, वैयक्तिक अर्थसहाय्य योजना, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृहे, भोजन योजना, कामगार महिलांसाठी आरोग्य योजना, कामगारांसाठी विमा योजना, यांसह विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

loading image