esakal | कारवाईमुळे सावकारांचे धाबे दणाणले! कर्जत होणार सावकारी पाशातून मुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Money-Lender

पोलिस कारवाईमुळे सावकारांचे धाबे दणाणले!

sakal_logo
By
सकाळवृत्त सेवा

कर्जत (जि. नगर) : तालुका सावकारी पाशातून कर्जमुक्त होताना दिसत असून, त्यामध्ये अडकलेले आता मोकळा श्वास घेत असल्याचे चित्र आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या धडक कारवाईमुळे सावकारांचे धाबे दणाणले आहे. नुकताच एक लाखावर दिवसाला एक हजार रुपये व्याज घेणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला. (money-lender-arrested-in-karjat-ahmednagar-marathi-news)

व्याजाला चक्रवाढ लावून रक्कम केली दुप्पट!

एजाज ऊर्फ भोप्या सय्यद (रा. कर्जत), असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पोलिसांत अवैध सावकारीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सावकाराने व्याजापोटी कोरे धनादेश आणि कारची नोटरी करून घेतली होती, हे विशेष. येथील पोलिसांच्या आवाहनानंतर तालुक्यात अवैध सावकारीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. आता सावकारीच्या चौथ्या घटनेने या क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

लॉकडाउनमुळे खासगी प्रवासी वाहने बंद झाल्याने संदीप कळसकर यांनी वाहनाचे हप्ते भरण्यासाठी एजाज ऊर्फ भोप्या सय्यद याच्याकडून ऑक्टोबर २०२० मध्ये व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते. मात्र, व्याजाचा दर एक लाखाला प्रतिदिन एक हजार रुपये होता. त्यानंतरही व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने फिर्यादी कळसकर यांनी सय्यद यांच्याकडून टप्प्याटप्प्याने दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर आरोपीने व्याजाला चक्रवाढ व्याजाची रक्कम लावल्याने मुद्दलाची रक्कम सहा लाख रुपयांवर गेली.

हेही वाचा: नगर जिल्ह्यात १० वीज उपकेंद्रे उभारणार - ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे

फिर्यादीने व्याजापोटी तीन लाख रुपये दिले. ते देऊनही ‘नऊ लाख रुपये आणखी द्यावे लागतील’ असे आरोपीने त्यास धमकावले. तसेच, पैसे वसूल करण्यासाठी वाहन अडवून दमदाटी व शिवीगाळ करीत होता. ‘माझी सध्या पैसे देण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे व्याज माफ करा, मी तुम्हाला मुद्दल टप्प्याटप्प्याने देतो,’ अशी केलेली विनंती आरोपीने फेटाळून लावली. संदीप कळसकर यांच्या फिर्यादीवरून अवैध सावकारीसह विविध कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

''कोणीही अवैध सावकारी करून कोणत्याही नागरिकाला वसुलीसाठी वारंवार फोन करणे, घरी येणे, शिवीगाळ करणे, वस्तू उचलून नेणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा त्रास देत असेल, तर कारवाई केली जाईल.'' - चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कर्जत

(money-lender-arrested-in-karjat-ahmednagar-marathi-news)

हेही वाचा: 'सांगा जगावं कसं?' वाढत्या महागाईत सफाई कामगरांचे पगार निम्मे; कामगार रस्त्यावर

loading image