esakal | नगर जिल्ह्यात १० वीज उपकेंद्रे उभारणार - ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे
sakal

बोलून बातमी शोधा

power substations

नगर जिल्ह्यात १० वीज उपकेंद्रे उभारणार - ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

श्रीरामपूर (जि. नगर) : राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन वीज धोरणास शेतकरी बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक शेतकरी थकीत वीज देयकांचा भरणा करीत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना विजेसंबधी समस्या भेडसावणार नाहीत याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (10 power substations to be set up in Nagar district says Minister of State for Energy)

महावितरणच्या येथील विभागीय कार्यालयात आज (शुक्रवारी) सायंकाळी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार लहू कानडे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी आढावा बैठकीत विविध पदाधिकारी, नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. विविध समस्या जाणून घेत महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. राज्यातील नवीन वीज धोरणाद्वारे शेतकऱ्यांना थकीत वीज देयकांत भरीव सूट दिली असल्याचे ते म्हणाले. तसेच, नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी नवी दहा वीज उपकेंद्रे उभारली जाणार असून, त्यांपैकी दोन वीज उपकेंद्रांचा श्रीरामपूर तालुक्याला थेट फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: यापुढे विधानसभा लढवणार नाही : विजय औटी

शहरातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेला अखंडित वीजपुरवठा देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देताना, ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी महावितरणने शेतकऱ्यांवर आर्थिक भार टाकू नये, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. तसेच, नागरिक व शेतकऱ्यांनी चालू वीजबिल भरण्याचे आवाहनदेखील ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी बैठकीत केले. आमदार कानडे व नगराध्यक्ष आदिक यांनी बैठकीत विविध सूचना मांडल्या, तर महावितरणचे कार्यकारी अभियंता थोरात यांनी तालुक्यातील चालू असलेल्या व नियोजित वीज योजनांची माहिती सादर केली. बैठकीला महावितरणचे अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी व ग्रामीण भागातील शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा: गर्भपात, अत्याचार गुन्ह्यातील वाढविली कलमे

loading image