esakal | नगर जिल्ह्यात आणखी कडक लॉकडाउन

बोलून बातमी शोधा

लॉकडाउन
नगर जिल्ह्यात आणखी कडक लॉकडाउन
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः "जनता कर्फ्यू' करूनदेखील जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाली नाही. आता कडक "लॉकडाउन' होणार आहे. तसेच केवळ दूध व आरोग्य सेवाच सुरू ठेवल्या जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार, बबनराव पाचपुते, लहू कानडे, किरण लहामटे, आशुतोष काळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आदी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, ""रुग्ण कमी होत नाहीत, याची चिंता असल्याने "लॉकडाउन' जाहीर केला; मात्र त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने झाली, याचा सारासार विचार केला पाहिजे. या काळात रुग्णसंख्या वाढली व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढली, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. शासनाला सगळ्यांनीच मदत केली पाहिजे. आगामी काळात आपल्याला कडकच "लॉकडाउन' करावा लागणार असून, फक्त औषधे व दुधाची दुकाने सुरू ठेवावीत, असे निर्देश आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.''

आता तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात आहे. आता जर आपण सुविधा, तसेच ऑक्‍सिजनचा पुरवठा वेळेत करू शकलो नाही, तर आपण राज्य चालविण्यामध्ये अपयशी ठरलो असे म्हटल्याशिवाय राहणार नाही. याचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यातील सर्व प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिल्याचेही ते म्हणाले.

नगर जिल्ह्यामध्ये 60 टन ऑक्‍सिजन लागतो. सध्या आपल्याकडे 35 टन ऑक्‍सिजन मिळत आहे. स्थानिक पातळीवर आपण दहा टन ऑक्‍सिजन मिळवत आहोत. आता आगामी काळामध्ये ऑक्‍सिजन प्लॅंट उभारण्यावर भर देणार आहोत. त्या प्रकारचे आदेशसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, कर्जत व जिल्हा रुग्णालय या ठिकाणी 11 कोटी रुपयांचे ऑक्‍सिजन प्लॅंट तयार करण्यात येणार असल्याचेही मुश्रीफ म्हणाले.

भाजपवाल्यांनाच इंजेक्‍शन पुरवले का?

भाजपच्या खासदारांना इंजेक्‍शन मिळाल्याबाबत न्यायालयामध्ये प्रकरण आहे. त्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही. मात्र, केंद्र सरकारने भाजपवाल्यांनाच इंजेक्‍शन पुरविली आहेत का, असा माझ्या मनामध्ये आता प्रश्न आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

दोन दिवसांत इंजेक्‍शन येणार

जिल्ह्यामध्ये 14 एप्रिलपासून आतापर्यंत 13 हजार 800 इंजेक्‍शन येथील प्रशासनाला प्राप्त झाली. त्यांचे वाटप शहर व ग्रामीण भागामध्ये करण्यात आले आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये इंजेक्‍शनचा पुरवठा सुरळीत होईल.