खळबळजनक ः तीन मुलींसह ती माय शेतात गेली होती...विहिरीत डोकावले तर

वसंत सानप
रविवार, 2 ऑगस्ट 2020

जामखेड पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांनी चौघींचे मृतदेह ताब्यात घेतले अाहेत. शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले आहेत. हा घात की अपघात याचा तपास सुरू आहे.

जामखेड : तीन मुलींसह शेतात गेलेली 32 वर्षीय महिला घरी परतलीच नाही. त्या चौघांचे मृतदेह विहिरीत आढळून आले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या चौघींच्या चपला विहिरीवर दिसल्या. मात्र, त्या काही दिसल्या नाहीत म्हणून शोधाशोध केली असता त्यांचे मृतदेह आढळून आले.

ही ह्रदयद्रावक घटना  जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे घडली. या संदर्भातील  कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेमुळे कुसडगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

जामखेड पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांनी चौघींचे मृतदेह ताब्यात घेतले अाहेत. शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले आहेत.

हेही वाचा - डॉ. विखे यांनी केली प्रशासनाची चिरफाड

या संदर्भात अधिक माहिती अशी ः जामखेड तालुक्यातील मुसळगाव येथील रामभाऊ कारले यांच्या पत्नी स्वाती कारले (वय 32), मुलगी अंजली (१२ वर्षे), दोन नंबरची मुलगी सायली (वय ९),  तीन नंबरची मुलगी कोमल (७ वर्षे) या चौघीही आज (रविवारी) सकाळी 11 वाजता आपल्या शेतात गेल्या होत्या. मात्र, शेतातून परतताना रस्त्यालगतच्या विहिरीच्या काठावर या चौघींच्या चपला इतरांना आढळून आल्या.

त्या चौघीही दिसल्या नाहीत म्हणून त्यांची शोधाशोध केली असता या चौघांचे मृतदेह त्या विहिरीत आढळून आले. ही घटना अपघात की अन्य काही ही या बाबत मात्र संदिग्धता निर्माण झाली आहे.

त्यांचे मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी शवविच्छेदनासाठी नेले. या संदर्भात जामखेड पोलिसात अाकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. ही घटना नेमकी कशातून घडली या संदर्भात पोलीस कसून तपास करीत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother's body with three daughters at Kusadgaon