तिच्या कष्टातून ‘थ्री स्टार’ची किमया; दोन मुली डॉक्टर व एक मुलगी वकील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ashok peharkar family

गरिबी आयुष्याच्या पाचवीलाच पुजलेली असतानाही तिने पदर खोचत शेतात मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकला.

Motivational Story : तिच्या कष्टातून ‘थ्री स्टार’ची किमया; दोन मुली डॉक्टर व एक मुलगी वकील

सोनई - गरिबी आयुष्याच्या पाचवीलाच पुजलेली असतानाही तिने पदर खोचत शेतात मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकला. पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असताना पती-पत्नीने आपल्या दोन मुली डॉक्टर, तर एक मुलगी वकील करून समाजापुढे आगळा आदर्श निर्माण करून दाखविला आहे. तुटपुंजे उत्पन, कष्ट व जिद्दीने पुढे आलेल्या थ्री-स्टार मुलींचे परिसरातून कौतुक होत आहे.

ऐतिहासिक वारसा असलेल्या भानसहिवरे गावात राहत असलेल्या अशोक पेहरकर यांचा हातगाव (ता. शेवगाव) येथील गणपत नामदेव अभंग यांची कन्या रंजनाचा विवाह झाला. त्यांना श्रुती, जान्हवी व अस्मिता अशा तीन मुली झाल्याने त्यांच्या पालनपोषणाची चिंता वाढली. प्राथमिक शिक्षणापासून तिघीही मुली वर्गात प्रथम येत असल्याने दोघांनी हाताला मिळेल ते काम करीत आपले आयुष्य त्यांच्या शिक्षणासाठीच समर्पित केले.

मोठी मुलगी श्रुतीचा बीएचएमएसला नंबर लागल्यानंतर पेहरकर परिवारास अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिला. अजय गांधी व मेहरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर केळकर यांनी एक लाखाची मदत केली. श्रुती पाठोपाठ जान्हवी सुद्धा डॉक्टर झाली तर लहान मुलगी अस्मिता वकिलीचे शिक्षण घेत आहे. तीन मुलींच्या पाठीवर त्यांना वंशाला दिवा मिळाला असला तरी त्यांच्या तीन पणत्यांनी निर्माण केलेला झगमगाट कष्टाचे चीज करणारा ठरला आहे.

सुखी संसार म्हणजे नेमके काय असावे, याची प्रचिती माझ्या डोळ्याने अनुभवली आहे. वडिलांची धडपड आणि आईचे कष्ट लक्षात ठेवून, मिळालेल्या संधीकडे व्यवसाय नव्हे तर सामाजिक वसा म्हणून पाहिले.

- डॉ. श्रुती पेहरकर, मुलगी