गेले मोटारसायकल चोर शोधायला, सापडला मोबाईल चोर

संजय आ. काटे
Monday, 1 February 2021

दोन दिवसांपूर्वी महेशलाही पकडण्यात आले. महेश एक बुलेट चोरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळला होता.

श्रीगोंदे : कर्जत तालुक्‍यातील एका मोटरसायकल चोराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून माहिती मिळविताना पोलिसांना त्याचा भाऊ याच चोरीत गुंतल्याचे समजले.

दोन दिवसांपूर्वी त्याला ताब्यात घेतले त्या वेळी त्याने मोटरसायकल नव्हे, तर मोबाईलचोरी केल्याचे सांगत, चोरीचे वीस मोबाईल काढून दिले. पोलिसांनी याबाबत अजून अधिकृत माहिती दिली नसली, तरी शिरूर, दौंड, श्रीगोंदे व कर्जत तालुक्‍यातील मोबाईलचोरी उघड होणार असल्याचे समजते. 

कर्जत तालुक्‍यातील गणेश मंगेश काळे या मोटरसायकल चोराला श्रीगोंदे पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून काही मोटरसायकली मिळाल्या; मात्र यात त्याचा भाऊ महेश मंगेश काळे हाही सामील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस त्याच्या मागावर होते.

हेही वाचा - शेतकऱ्यांना मिळणार पाच हजार रूपयांची पेन्शन

दोन दिवसांपूर्वी महेशलाही पकडण्यात आले. महेश एक बुलेट चोरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळला होता. मात्र, त्याची कबुली न देता त्याने मोबाईलचोरी केल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्याच्याकडून वीस मोबाईल ताब्यात घेतले. ऊसतोडणी मजूर झोपल्यानंतर आरोपी महेश व त्याचा एक मेव्हणा मोबाईलचोरी करीत असल्याचे पोलिसांना समजले. दुसरा आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Motorcycle thief confesses to mobile theft