esakal | रेमडेसिव्हिरचा बेकायदा साठा आणल्याने भाजप खासदार विखे अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार सुजय विखे

रेमडेसिव्हिरचा बेकायदा साठा आणल्याने भाजप खासदार विखे अडचणीत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदनगर ः रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा साठा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगरला बेकायदा आणल्याप्रकरणी ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झालीय. या प्रकरणी न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती बी. यू. देबडवार यांनी खासदारांविरोधात कारवाई करण्याची मुभा नगर पोलिसांना असल्याचे स्पष्ट केले आहे. या याचिकेवर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

नगर मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विनापरवाना दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा (ड्रग्ज) साठा विशेष विमानाने नगरला आणला. रेमडेसिव्हिर वापराआधीचे भेसळयुक्त, भेसळमुक्त असे प्रमाणपत्र घेतलेले नाही, तसेच इतका साठा कुठे व कसा वापरला, याचा हिशेब नसल्याने डॉ. विखे यांच्या विरोधात पोलिस अधीक्षकांकडे कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती.

ही कारवाई न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत, फौजदारी कारवाईची विनंती करण्यात आली होती. या बाबत न्यायमूर्तींनी खासदाराव्यतिरिक्त अन्य व्यक्तीने असे कृत्य केले असते तर जशी कारवाई केली असती, त्याप्रकारची कारवाई डॉ. विखेंविरोधात करण्यास नगर पोलिसांना मुभा असल्याचे स्पष्ट करत, याचिका 29 एप्रिल रोजी सुनावणीस ठेवली आहे.

या प्रकरणात अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी ऍड. सतीश तळेकर यांच्यातर्फे औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटल्यानुसार, खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत नगर जिल्ह्यात दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन विशेष विमानाने आणून तीन रुग्णालयांना वाटप केली होती.

या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावरही चित्रफितीद्वारे सांगितले होते. यावर आक्षेप घेत याचिकाकर्त्यांनी डॉ. विखे यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी नगर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली; मात्र त्यावर कारवाई न झाल्याने याचिकाकर्त्यांनी खंडपीठात धाव घेतली. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. प्रज्ञा तळेकर यांनी बाजू मांडली. त्यांना ऍड. अजिंक्‍य काळे, ऍड. राजेश मेवारा यांनी सहकार्य केले. शासनातर्फे डी. आर. काळे काम पाहत आहेत.

आम्हाला लोकं उगंच डोक्यावर घेत नाहीत

दरम्यान विखे यांनी राष्ट्रवादीच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणतात, मी मतदारसंघाबाहेरील लोकांना उत्तर देण्यास जबाबदार नाही. आम्ही चांगले काम केले नसते तर लोकांनी आम्हाला पन्नास वर्षे डोक्यावर घेतले नसते.

loading image