खासदार लोखंडे-वाकचौरेंची कांद्या पोह्यांनी केली दिलजमाई, निवडणुकीतील टायमिंगवर झाली चर्चा

सतीश वैजापूरकर
Monday, 11 January 2021

खासदार लोखंडे यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. पोह्यांचा आस्वाद घेत चहापान घेतले. तासभराच्या या भेटीत दोघांनीही मोकळेपणाने चर्चा केली. 

शिर्डी ः निर्णय चुकला की राजकारणात त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. तरीही निर्णय घ्यावेच लागतात. या मुद्यावर परस्पर सहमती व्यक्त करीत खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे आदरातिथ्य स्वीकारले.

दोघांनीही कांदा पोह्यांचा आस्वाद घेत भुतकाळातील कटू आठवणी विसरून जायचे ठरविले. चुकलेल्या राजकीय निर्णयांवर मोकळेपणाने चर्चा केली. शहरातील हॉटेल व्यावसाईक दिलीप वाकचौरे यांच्या पुढाकारातून ही सदिच्छा भेट झाली. 

हेही वाचा - मोबाईल अॅपने केला घात, पुणेकर गेले धरणात वाहून

खासदार लोखंडे यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. पोह्यांचा आस्वाद घेत चहापान घेतले. तासभराच्या या भेटीत दोघांनीही मोकळेपणाने चर्चा केली. 

मोदी लाटेवर स्वार होत खासदार सदाशिव लोखंडे येथून सलग दोन वेळा लोकसभेत गेले. लाटेवर स्वार होण्याची सुवर्णसंधी चालून आलेली असताना माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ती हातची घालविली.

शिवसेनेचे खासदार असताना पुन्हा त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. ही उमेदवारी नाकारून त्यांनी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी स्वीकारली. मोदी लाटेत पराभव वाट्याला आला. दुसऱ्यावेळी पुन्हा मोदी लाट आली तिच्यावर स्वार होत खासदार लोखंडे दुसऱ्यांदा लोकसभेत गेले. तर वाकचौरे यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लागोपाठ दोन्ही निर्णय चुकले. 

लोखंडे हसू अडवाणींचे पट्टशिष्य

खासदार लोखंडे यांनीदेखील या भेटीत त्यांच्या चुकलेल्या निर्णयावर भाष्य केले. तत्कालीन जनसंघाचे ज्येष्ठ नेते हशू अडवाणी यांच्या तालमीत तयार झालेल्या लोखंडे यांना 2009 साली मुंबईतील चेंबूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवायची होती. तत्कालीन खासदार राम नाईक यांच्याकडे तिकीटवाटपाचे अधिकार होते.

भाजपच्या दुसऱ्या यादीत नाव असूनही नाकारली उमेदवारी

पहिल्या दोन यादीत लोखंडे यांचे नाव नव्हते. त्यामुळे संतापलेल्या लोखंडे यांनी तिसऱ्या यादीत नाव येऊनदेखील उमेदवारी नाकारली. शेजारच्या कुर्ला मतदार संघातून मनसेच्या तिकिटावर उमेदवारी लढविली. त्यात अवघ्या तीन हजार मतांच्या फरकाने त्यांना पराभूत व्हावे लागले.

केवळ चुकीच्या निर्णयामुळे आमदारकीची हातातोडांशी आलेली संधी त्यावेळी हुकली. त्यापूर्वी ते भाजपच्या तिकिटावर कर्जत-जामखेड मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार झाले. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रवेश शिवसेनेत प्रवेश केला. आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा खासदार झाले. 2009 साली चुकलेला निर्णय मात्र त्यांनी कायमचा लक्षात ठेवला. 

दोन पराभवानंतर भाजपची उमेदवारी

माजी खासदार वाकचौरे यांनाही साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते खासदार अशी फार मोठी संधी मिळाली. अर्थात चुकीच्या निर्णयामुळे ती नंतर हुकली. तेही पुन्हा भाजपत आले.

दोन पराभवानंतर न खचता पुन्हा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपची उमेदवारी केली. थोड्या मतांनी पुन्हा संधी हुकली. या दोघा आजीमाजी खासदारांना चुकीच्या निर्णयाची मोठी किंमत मोजावी लागली.

या भेटीत दोघांनीही त्यावर चर्चा केली. भुतकाळात घेतलेले निर्णय चुकीचे होते. "गुजरा हुआ जमाना आता नहि दुबारा' हे वास्तव स्वीकारीत दोघांनीही कटुता विसरण्याचा निश्‍चय करीत ही सदिच्छा भेट आटोपती घेतली. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Lokhande-Wakchaure and two opponents came together