esakal | दुधाला वर्षभर ३२ रुपये भाव द्या; खासदार लोखंडेंची लोकसभेत मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

MP Sadashiv  Lokhande

दुधाला वर्षभर ३२ रुपये भाव द्या; खासदार लोखंडेंची लोकसभेत मागणी

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

शिर्डी (जि. नगर) : उसाप्रमाणे दुधालाही एफआरपी लागू करा. उत्पादकांना वर्षभर प्रतिलिटर ३२ रुपये शाश्वत भाव द्या, अशी मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज (मंगळवार) लोकसभेत केली. तथापि केंद्र व राज्य सरकारची तसे करण्याची मानसिकता नाही. असे असले तरी दुधासाठी एफआरपी हा राज्यातील दूधउत्पादकांसह जवळपास एक कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज तो पुन्हा चर्चेत आला.


लोकसभेत बोलताना आज लोखंडे यांनी दूधउत्पादकांच्या व्यथा नेमक्या शब्दांत मांडल्या. ते म्हणाले, ‘‘दुधाचा उत्पादन खर्च प्रतिलिटर २७ रुपये आणि भाव मात्र २२ ते २५ रुपये प्रतिलिटर मिळतो. त्यातच गोहत्याबंदी कायद्याने भाकड जनावरांचा अर्थिक भार उत्पादकांवर पडला. उसाप्रमाणे दुधाला एफआरपी लागू करून प्रतिलिटर ३२ रुपये भाव द्यावा.’’


लोखंडे यांच्या या तारांकीत प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रूपाल म्हणाले, ‘‘केंद्र सरकार दूध खरेदी करीत नाही. तो राज्य सरकारचा विषय आहे. आम्ही देशभरातील दूध उत्पादक व सहकारी संस्थांसाठी विविध योजना राबवतो. पुढील पाच वर्षांत त्यासाठी नऊ हजार ८०० कोटी रुपये खर्च केले जातील.’’ याचा अर्थ असा की त्यांनी राज्याकडे बोट दाखविले. राज्य सरकारने ग्रामीण भागातील हजारो कष्टकऱ्यांची रोजीरोटी अवलंबून असलेल्या व्यवसायातून केंव्हाच अंग काढून घेतले. नियंत्रणे असलेला सहकार आणि मुक्तव्यवसाय करणारे खासगीक्षेत्र, अशी विषम स्पर्धा सुरू झाली. खासगी दूध संकलनाचा वाटा ७० टक्क्यांवर, तर सहकार जेमतेम ३० टक्के दूधसंकलन करते, अशी विदारक स्थिती राज्यात आहे.

हेही वाचा: HSC Result 2021 : नगर जिल्ह्याचा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला


तथापि ८० टक्के दूध भुकटी व बटर व मिठाईसाठी वापरले जाते. अमूल किंवा गोकुळ हे सहकारी माॅडेल डोळ्यांसमोर ठेऊन दुधाला वर्षभर ३२ रुपये भाव देणे शक्य आहे. त्यासाठी एकतर भुकटी उद्योजकांना किंवा थेट उत्पादकांना अनुदान देऊन हे शक्य आहे. साखरेचे भाव स्थिर ठेवण्यात मोदी सरकार यशस्वी झाले. तसे सर्व उत्पादक राज्यांनी साथ दिल्यास दुधाचे भाव स्थिर ठेवण्यात यशस्वी होऊ शकते. तसे झाले तरच उत्पादक जगतील अन्यथा या व्यवसायाला राम राम ठोकतील.

दूध भुकटी व उपपदार्थ तयार करणाऱ्या उद्योजकांवर या व्यवसायाचे भवितव्य अवलंबून आहे. भुकटीच्या भावावर दुधाच्या भावाचे गणित अवलंबून असते. अमूलचे माॅडेल समोर ठेऊन, दुध भुकटीच्या जागतिक भावाचे गणित मांडता येईल. ग्राहकांनी एकतीस रुपये किलो दराची साखर मान्य केली, तशी पस्तीस रुपये लिटर दूध खरेदी करण्याची तयारी ठेवावी. तरच उत्पादक जगतील. - सुनील सदाफळ, संचालक, पंचकृष्ण डेअरी व डेअरी प्राॅडक्ट, राहाता

हेही वाचा: आई ती आईच! लेकरासाठी मातेचे बिबट्याशी दोन हात

loading image
go to top