esakal | लोकांसाठीच माझं वजन वापरलं, कोणतीही चौकशी करा हो...

बोलून बातमी शोधा

खासदार सुजय विखे
लोकांसाठीच माझं वजन वापरलं, कोणतीही चौकशी करा हो...
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर ः ""रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचे वितरण नियमाला धरूनच करण्यात आले आहे. याबाबतचे सर्व रेकॉर्ड आपल्याकडे आहे. आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत,'' अशी भूमिका नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केली.

खासदार डॉ. विखे मंगळवारी (ता. 27) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनसह विविध विषयांबाबत भूमिका स्पष्ट केली.

खासदार डॉ. विखे यांनी खासगी चार्टर्ड विमानाने दिल्लीहून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन नगर जिल्ह्यात आणली. त्यातील तीनशे इंजेक्‍शन नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालय, तसेच काही इंजेक्‍शन शिर्डी येथील रुग्णालयास वितरित केली आहेत. डॉ. विखेंनी या इंजेक्‍शनच्या वितरणानंतर विमानात स्वतः एक व्हिडिओ तयार केला. त्यात त्यांनी "आपण दिल्लीहून खासगी विमानाने औषधे घेऊन आलो आहोत. कोरोना रुग्णांचे इंजेक्‍शनअभावी जीव जात आहेत. अशा स्थितीत त्यांचे जीव वाचविण्यासाठी आपण हे पाऊल उचलले आहे. आपण इंजेक्‍शन व्यक्तिगत संबंधावर आणली आहेत,' असे नमूद केले आहे. याच व्हिडिओमध्ये शिर्डी विमानतळावर विमानातून अनेक बॉक्‍स उतरवून घेतानाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा: बोंबलत फिरणाऱ्यांना चार लाखांचा दंड

"खासदार विखेंनी मोठ्या संख्येने रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आणली आहेत. ती जप्त करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत समन्यायी पद्धतीने वाटप करावीत. याप्रकरणी कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास कायदेशीर कारवाई करावी,' अशी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, बाळासाहेब विखे, चंद्रभान घोगरे यांनी दाखल केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर खासदार डॉ. विखे यांना विचारले असता ते म्हणाले, ""रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचे वितरण हे नियमाला धरून करण्यात आले आहे. या इंजेक्‍शनचे सर्व रेकॉर्ड आपण जपून ठेवले आहे. ते कोणीही पाहू शकते. आपण व्हिडिओमध्ये दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आणल्याचे कोठेही म्हटलेले नाही. दहा हजार ही संख्या कोणी आणली, हे आपणास माहिती नाही. कोरोना रुग्ण इंजेक्‍शनअभावी मरत असताना आपण स्वस्थ राहू शकत नाही. त्यांना उपचार मिळण्यासाठीच ही इंजेक्‍शन आणली आहेत.

सर्व जण एका मोठ्या संकटातून जात असताना यावर राजकारण करणे योग्य नाही. आपण कोणतीही फसवणूक केलेली नाही. विखे कुटुंबीय सतत जनतेच्या हितासाठी काम करत आले आहेत. (स्व.) बाळासाहेब विखे यांच्यासह विखे कुटुंबीयांबरोबर सर्वसामान्य जनता गेल्या पन्नास वर्षांपासून राहिली आहे. पक्ष कोणताही असला, तरी सर्वसामान्य जनतेने विखे कुटुंबाला साथ दिली आहे.''

जिल्ह्यातील लोकांना बांधील

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनबाबत परजिल्ह्यातील व्यक्‍तींनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्यातील जनतेने मला प्रश्‍न विचारले तर मी त्यांना उत्तर देण्यास बांधील आहे. परजिल्ह्यातील व्यक्‍तींच्या प्रश्‍नांना उत्तर देण्यास आपण बांधील नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.