
MSEDCL : वीजप्रश्नी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक
राहुरी : शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नावर सत्ताधारी भाजपचा मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण वीजबिल माफीसह विविध मागण्यांसाठी तहसीलदार, प्रांताधिकारी व महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे देण्यात आला आहे.
राहुरी येथे आज (सोमवारी) राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश सरकारप्रमाणे शेतकऱ्यांचे वीज बिल भरावे. थकीत वीजबिल वसुलीसाठी शेतीचा वीजपुरवठा खंडित करू नये.
शेतीसाठी दिवसा बारा तास वीजपुरवठा करावा. शेतकऱ्यांचे संपूर्ण थकीत वीजबिल माफ करावे. शेतीसाठी मोफत वीज द्यावी. शेतकऱ्यांचा बंद केलेला वीजपुरवठा तत्काळ सुरू करावा, अन्यथा प्रशासन व महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल.
निवेदनावर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (उत्तर) शरद बाचकर, जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, तालुकाध्यक्ष शिवाजी सरक, उमेश बाचकर, बिलाल शेख, करण माळी, बापूसाहेब विटनोर, पोपट विटनोर, अण्णासाहेब सरोदे, अण्णासाहेब कोळेकर, आप्पासाहेब विटनोर, विजय कोळसे, भारत हापसे, अभिमन्यू बाचकर, शिवाजी कोळसे यांच्या सह्या आहेत.