
अहिल्यानगर : वीजपुरवठा खंडित झाला म्हणून महावितरण कंपनीच्या केडगाव येथील कार्यालयात घुसून जमावाने तेथील खुर्च्या, रजिस्टर व इतर साहित्याची तोडफोड करत तेथे असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. ८) रात्री ९ च्या सुमारास घडली. या प्रकरणी माजी नगरसेवक अमोल येवले यांच्यासह १२ ते १५ जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महावितरणचे शहर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनील रघुनाथ राहिंज (वय ४५, रा. सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, बुरुडगाव रोड) यांनी फिर्याद दिली आहे.