मीटरसाठी अभियंत्याने मागितली लाच, पैसे घेताच बसला 'करंट'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

मिटर देण्यासाठी पाच हजारांची मागणी केली. तडजोडीअंती चार हजार देण्याचे ठरले. तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संबंधित सहायक अभियंत्यास पकडले.

नगर : विद्युत जोडणी व मिटरसाठी तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून महावितरणच्या सहायक अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई भावळणी येथील महावितरण कार्यालयात घडली. 

भाऊसाहेब गोविंद पगारे (वय 44, रा. शिवनगर, पाइपलाइन रोड, सावेडी) असे त्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी, तक्रार व त्याच्या मित्राने जामगाव येथे एकत्रित पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्या ठिकाणी विद्युत जोडणी घेण्याकरिता त्यांनी फेब्रुवारीमध्ये ऑनलाईन कोटेशन भरले होते. त्यानंतर भाळवणी येथील महावितरणच्या कार्यालयाकडे वारंवार विद्युत जोडणी व मिटरची मागणी केली. परंतु, विद्युत जोडणी करून दिली नाही.

तक्रारदाराने आज सहायक अभियंता भाऊसाहेब पगारे यांची भेट घेतली असता त्यांनी मिटर देण्यासाठी पाच हजारांची मागणी केली. तडजोडीअंती चार हजार देण्याचे ठरले. भाऊसाहेब पगारे यांना तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

रात्रीपर्यंत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सहायक अभियंता पगारे यांच्याविरुद्ध जानेवारी 2004 मध्येही लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. अहमदनगर
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL official arrested