मुळा- भंडारदरा पाणलोटात पावसाची पुन्हा मुसंडी

शांताराम काळे
Saturday, 8 August 2020

भंडारदरा व मुळा पाणलोट क्षेत्रात विश्रांतीनंतर दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने मुसंडी मारली आहे.

अकोले (अहमदनगर) : भंडारदरा व मुळा पाणलोट क्षेत्रात विश्रांतीनंतर दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने मुसंडी मारली आहे. शु्क्रवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या चोवीस तासांत घाटघर येथे सर्वाधिक, म्हणजे पावणेसात इंच (170 मिलिमीटर) आणि रतनवाडी येथे सव्वासहा इंच (159 मिलिमीटर) पाऊस झाला. पाऊस टिकून राहिला तर 15 ऑगस्टपर्यंत भंडारदरा धरण नऊ टीएमसीपर्यंत भरण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

कळसूबाई व रतनगडाच्या कातळावरून मनमोहक धबधबे कोसळू लागल्याने भंडारदरा जलाशयात 609 दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक झाली. त्यामुळे जलाशयात सकाळी सहा वाजता 6637 दशलक्ष घनफूट, म्हणजे 60.12 टक्के साठा झाला होता. पावसामुळे वाकी जलाशयातूनही 1022 क्‍यूसेकने विसर्ग सुरू असल्याने, निळवंडे धरणातही वेगाने पाण्याची आवक होत आहे. निळवंडे धरणाचा साठा 4453 दशलक्ष घनफूट (53.47 टक्के) झाला आहे. 

भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील 42 किलोमीटर क्षेत्रात ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पांजरे येथे 130 मिलिमीटर, वाकी 70, भंडारदरा 127, घाटघर 170 व रतनवाडीत 159 मिलिमीटर पाऊस झाल्याने परिसरातील सर्व धबधबे कोसळू लागले आहेत. मात्र, हे निसर्गरम्य दृश्‍य पाहण्यासाठी पर्यटकांना बंदी असल्याने परिसरातील व्यावसायिक अडचणीत आले आहेत. जलाशयावर म्हणावा इतका बंदोबस्त नाही; मात्र अभयारण्य क्षेत्रातील सर्वच चेकपोस्टवर वनकर्मचारी कार्यरत आहेत. 

मुळा पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असून, कुमशेत परिसरातील नऊ बंधारे भरले आहेत. मुळा नदीही दुथडी भरून वाहत आहे. भातखाचरांत पुरेसे पाणी आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अकोले, राजूर, कोतूळ, भंडारदरा, समशेरपूर परिसरात काल रात्रीपासून पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरवात केल्याचे दिसत आहे. हरिश्‍चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाड्या-वस्त्यांवर शेतकरी डोक्‍यावर इरली, घोंगडी पांघरून शेतीच्या कामात व्यग्र झाले आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mula Bhandardara catchment rains again