मुळा धरणात पाणीच येईना, मागच्या वर्षीपेक्षाही कमी आहे साठा

विलास कुलकर्णी
Friday, 7 August 2020

मागील वर्षी मुळा धरण एक ऑगस्ट रोजी 50 टक्के भरले होते. नंतर सलग सहा दिवस पाणलोटात मुसळधार पाऊस कोसळला. अवघ्या सहा दिवसात आठ हजार दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले होते.

राहुरी : मुळा धरणाच्या पाणलोटात दीर्घ प्रतीक्षेनंतर मागील दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली. हरिश्चंद्रगड ते कोतुळ दरम्यान घाटमाथ्यावर रात्री पाऊस, दिवसभर उघडीप. असा लपंडाव सुरू आहे.

कोतूळ (लहित खुर्द) येथून मुळा नदीपात्राद्वारे धरणात आज (शुक्रवारी) सकाळी सहा वाजता 10342 क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती. आज दुपारी तीन वाजता धरण 50 टक्के भरले.

मागील वर्षी आजच्या तारखेला धरणसाठा 81 टक्के होता. त्या तुलनेत आजच्या दिवशी धरणसाठा 31 टक्क्यांनी कमी आहे.

मागील वर्षी मुळा धरण एक ऑगस्ट रोजी 50 टक्के भरले होते. नंतर सलग सहा दिवस पाणलोटात मुसळधार पाऊस कोसळला. अवघ्या सहा दिवसात आठ हजार दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले होते.

आजच्या तारखेला धरणसाठा झपाट्याने 81 टक्क्यांवर पोहोचला होता. मागील वर्षी आठ ऑगस्ट रोजी धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडून मुळा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन महिन्यात पाऊस रुसला होता.

धरणाच्या लाभक्षेत्रात राहुरी तालुक्यात मात्र मागील दोन महिन्यात सरासरीच्या अडीचपट पाऊस कोसळला.
मुळा धरणात लहित खुर्द येथून आज सकाळी नऊ वाजता 9,155 तर, दुपारी तीन वाजता 5,016 क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती. हरिश्चंद्रगडाच्या घाटमाथ्यावर रात्री पाऊस सुरु होतो. दिवसा उघडतो. त्यामुळे सकाळी धरणात पाण्याची आवक चांगली असते. दुपारपर्यंत पाण्याची आवक घटत जाते. 
पर्जन्यमापक असून नसल्यासारखे...!

हेही वाचा - रेल्वेने उडवल्या ४० मेंढ्या

मुळा धरणाच्या पाणलोटात अकोले तालुक्यात 14. पारनेर, संगमनेर व राहुरी तालुक्यात 28 असे एकूण 42 ठिकाणी पर्जन्यमापक आहेत. पावसाळ्यात पाच महिने पर्जन्याची दैनंदिन नोंद ठेवली जाते. परंतु, पर्जन्य नोंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जलसंपदा खात्यातर्फे प्रति महिना 140 रुपये प्रमाणे पाच महिन्याचे अवघे 700 रुपये मानधन दिले जाते.

तुटपुंज्या मानधनामुळे 42 ठिकाणी नेमलेले मोजणीदार दैनिक पर्जन्याच्या नोंदी जलसंपदा खात्यात कळवीत नाहीत. त्यामुळे 'मुळा' च्या पाणलोटातील पावसाची माहिती मिळत नाही. त्यांना मानधन वाढविण्याची बऱ्याच वर्षांची मागणी लालफितीत अडकली आहे. त्यामुळे पर्जन्यमापक असून नसल्यासारखे आहे.

मुळा धरण क्षमता (दशलक्ष घनफूट) ... 26,000
आजच्या दिवशी ...
मागील वर्षीचा साठा ... 20,014
आजचा साठा (दुपारी तीन वाजेपर्यंत) ... 13,017
अचल साठा ... 4,500
उपयुक्त साठा ... 8,517

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mula dam is half full