esakal | महापालिकेची रक्तपेढी खासगीवाल्यांच्या घशात

बोलून बातमी शोधा

Municipal blood bank is closed}

महापालिकेची रक्तपेढी बंद पडली आहे. काही पदाधिकारी ती खासगीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत.

महापालिकेची रक्तपेढी खासगीवाल्यांच्या घशात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः_ महापालिकेची रक्‍तपेढी बेकायदेशीरपणे बंद करण्यात आली आहे. रक्‍तपेढीचे खासगीकरण करण्याचा डाव आखण्यात येत आहे, असा आरोप करीत, रक्‍तपेढी बंद ठेवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की महापालिका प्रशासनाने मागील सात-आठ महिन्यांपासून रक्तपेढी बंद ठेवली आहे. तेथील कर्मचाऱ्यांची इतरत्र नियुक्‍ती करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्‍तांकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या रक्‍तपेढीमध्ये नागरिकांना 350 रुपये एवढ्या माफक दरात रक्तपिशवी मिळते. 

महापालिका प्रशासनाने दिशाभूल करून डॉक्‍टर, नर्स, लिपिक, तंत्रज्ञ आदींच्या इतर विभागांत बदल्या केल्या आहेत. अत्यावश्‍यक विभाग बेकायदेशीरपणे बंद केला आहे. या रक्‍तपेढीला जिल्हा नियोजन मंडळाकडून एक कोटी रुपयाचे यंत्र भेट देण्यात आले आहे. बंद असल्याने ते खराब होण्याची शक्‍यता आहे.

रक्तपेढी बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तपिशव्यांसाठी भटकंती करावी लागत आहे. त्यासाठी जास्त पैसेही मोजावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाला तातडीने रक्‍तपेढी सुरू करण्याचे आदेश द्यावेत. रक्‍तपेढी तत्काळ सुरू न केल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्‍तांच्या दालनासमोर शिवसैनिकांसह आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बोराटे यांनी निवेदनात दिला आहे. अहमदनगर