
महापालिका आयुक्तपदाची सूत्रे मार्चमध्ये हाती घेतली, तेव्हा कोरोना या संसर्गजन्य व भयानक विषाणूचा प्रादूर्भाव सुरू झाला होता.
अहमदनगर : महापालिका आयुक्तपदाची सूत्रे मार्चमध्ये हाती घेतली, तेव्हा कोरोना या संसर्गजन्य व भयानक विषाणूचा प्रादूर्भाव सुरू झाला होता. शहराची माहिती नाही, कर्मचाऱ्यांची माहिती नसतानाही सर्व अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारी एकजुटीने परिस्थितीला दृढ निश्चयाने सामोरे गेलो.
कोरोना संकटातील सेवेचा अनुभव सदैव स्मरणात राहील, असे प्रतिपादन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले.
आयुक्त मायकलवार उद्या (गुरुवारी) सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की कोरोना रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कठोर पावले उचलत टाळेबंदी घोषीत केली. रोज वेगवेगळे निर्देश दिले जात होते. त्याची आम्ही प्रभावीपणे अंमलबजावणी केली. कोरोना संसर्ग रोखण्यात व रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यात नगरकरांची साथ लाभल्याने यश मिळाले.
महापालिकेतील 7 अधिकारी-कर्मचारी उद्या (गुरुवारी) निवृत्त होत आहेत. त्यात आयुक्तांसह कामगार अधिकारी दिगंबर कोंडा, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेंद्रकुमार सारसर यांचाही समावेश आहे.
आयुक्त मायकलवार यांच्या निवृत्तीमुळे नववर्षापासून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार दिला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीचे जिल्हाधिकारी अनिल कवडे, राहुल द्विवेदी यांनीही महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार पाहिला आहे.
संपादन : अशोक मुरुमकर