महापालिकाच कर्मचाऱ्यांच्या मुळावर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

पोलिस व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लॉकडाउन काळात चांगले काम केले. त्यामुळे नगर शहर काही काळ कोरोना मुक्‍त राहण्यात यश मिळाले होते. मात्र लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शहरात कोरोना बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. हे प्रमाण कसे आटोक्‍यात आणावे हे आता महापालिकेला अवघड झाले आहे. शहरातील सिद्धार्थनगर व दिल्लीगेट भागात महापालिका कर्मचाऱ्यांची वस्ती आहे.

नगर : शहरातील तोफखाना, सिद्धार्थनगर, दिल्लीगेट, नालेगाव, आडतेबाजार परिसरात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या भागातील सिद्धार्थनगर व दिल्लीगेट परिसरात महापालिका कर्मचाऱ्यांची वस्ती आहे. मात्र महापालिकेकडूनच या दोन्ही भागांतील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र नियम वापरण्यात आलेले आहेत. तसेच त्यांना सापत्न वागणूकही महापालिका कामगार युनियनकडून दिली जात आहे. त्यामुळे सध्या महापालिका कर्मचाऱ्यांतच कन्टेन्मेंट झोनमध्ये पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत असंतोष आहे. 

पोलिस व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लॉकडाउन काळात चांगले काम केले. त्यामुळे नगर शहर काही काळ कोरोना मुक्‍त राहण्यात यश मिळाले होते. मात्र लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शहरात कोरोना बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. हे प्रमाण कसे आटोक्‍यात आणावे हे आता महापालिकेला अवघड झाले आहे. शहरातील सिद्धार्थनगर व दिल्लीगेट भागात महापालिका कर्मचाऱ्यांची वस्ती आहे. याभागातही कोरोनाने प्रवेश केला आहे. त्यामुळे महापालिकेने हा भाग कन्टेन्मेंट झोन केला आहे मात्र महापालिकेने सिद्धार्थनगर भागातील महापालिकेच्या वसाहती वगळून कन्टेन्मेंट झोन केला. मात्र हाच नियम दिल्लीगेट परिसरातील महापालिका कर्मचारी वसाहतीला लावला नाही. या वस्तीत कोरोनाबाधित रुग्णच आढळून आलेला नाही. 

दिल्लीगेट भागातील महापालिका वसाहतीलाच महापालिकेकडून गेली पाच दिवसांपासून जीवनावश्‍यक वस्तूच पुरविण्यात आलेल्या नाहीत. शहरातील कोणत्याही कन्टेन्मेंट झोनमध्ये महापालिकेकडून औषध फवारणी, आरोग्य तपासणी अशा कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. शिवाय महापालिका कामगार युनियनने महापालिका कर्मचारी कन्टेन्मेंट झोनमध्ये जाऊन काम करणार नाहीत असे जाहीर केल्याने महापालिकेचे कर्मचारीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतच स्वच्छतेसाठी येत नाहीत. त्यामुळे महापालिकाच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या मुळावर आले आहे. महापालिकेच्या कन्टेन्मेंट झोन करताना करण्यात आलेल्या चुकीमुळे नालेगावमधील कोरोना बाधित भागातील नागरिक महापालिकेच्या दिल्लीगेट भागातील वस्तीत सहज येत आहेत. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कोरोना धोका निर्माण झाला आहे, असे असताना महापालिकेकडून काही मदत मिळत नसल्याने नागरिकांत असंतोष आहे. 

सिद्धार्थनगर भागात महापालिका कर्मचारी - 600 ते 650 
दिल्लीगेट परिसरात महापालिका कर्मचारी - 100 ते 125 
 
कन्टेन्मेंट झोनमध्ये असलेल्या महापालिकेच्या वसाहतीत महापालिकेडून जीवनावश्‍यक वस्तू पुरविल्या जात नाहीत. याबाबत मी महापालिका आयुक्‍तांसह विविध अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून मदत मिळत नाही. कन्टेन्मेंट झोन परिसरात स्वच्छतेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
- अविनाश हंस, स्वच्छता निरीक्षक, महापालिका, नगर. 

महापालिकेतील कर्मचारीही माणसे आहेत. त्यांनाही कोरोना होण्याचा धोका आहे. ते कन्टेन्मेंट झोनमधून बाहेरही पडणार नाहीत व कन्टेन्मेंट झोनमध्ये जाऊन कामही करणार नाहीत. 
- अनंत लोखंडे, अध्यक्ष, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation is based on employees