अग्निशामक विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ आणि वाहने नसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar Municipal Corporation

अग्निशामक विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ आणि वाहने नसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अहमदनगर : नगर शहराचा विस्तार पाहता, महापालिकेची असलेली अग्निसुरक्षा यंत्रणा तोकडी आहे. अग्निशामक विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ आणि वाहने नसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात आगीच्या घटनांत कोट्यवधींचे नुकसान झाले तरी महापालिकेकडून ही यंत्रणा सक्षम करण्याकडे डोळेझाक होत असून, ही गंभीर बाब आहे.

जुन्या महापालिकेचे सभागृह व शिल्पकार प्रमोद कांबळे यांचे कलादालन आगीत जळून खाक झाले. जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही रुग्णांना जीव गमवावा लागला. हाकेच्या अंतरावर असलेल्या महापालिकेच्या अग्निशामक विभागाला ही आग वेळेत विझविता आली नाही. दिवाळी सणाला फटाक्यांमुळे आगीच्या घटना नेहमीच्याच. उन्हाळ्यातही आगीच्या घटनांत वाढ होते. असे असतानाही महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत, अग्निशमन विभागाच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष करत आहे.

या विभागात पुरेसे कर्मचारी तर नाहीतच, पण जे आहेत त्यांच्यातीलही प्रशिक्षित बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. शहराचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या पाहता, आणखी दोन अग्निशामक वाहनांची आवश्यकता आहे. जुन्या अग्निशामक वाहनांची कालमर्यादा संपली आहे. नवीन वाहनांची मागणी केली आहे, परंतु यावर अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी अग्निशामक विभागाच्या सुविधांकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

केडगावचे केंद्र बंद

शहराच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने तीन अग्निशमन केंद्रांची निर्मिती केली आहे. शहरात माळीवाडा भागात मुख्य केंद्र असून, उपनगरांत सावेडी व केडगाव येथे उपकेंद्रे आहेत. त्यांपैकी केडगाव केंद्र कर्मचाऱ्यांअभावी बंद पडले आहे. माळीवाडा केंद्रात अपुरी वाहने व अत्यल्प कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे.

लोकसंख्येप्रमाणे हवीत वाहने

शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाख आहे. त्यात पन्नास हजार लोकसंख्येसाठी एका अग्निशमन वाहनाची आवश्यकता आहे. मात्र, शहरात सध्या केवळ मोठी दोन आणि एक रेस्क्यू वाहन आहे. ड्रायव्हर, मदतनीस, तसेच फायरमन व क्लार्क मिळून २१ जणांचे संख्याबळ आहे. त्यांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते. त्यांना रजादेखील घेता येत नाहीत.

ग्रामीण भागातही सुरक्षेचा प्रश्न

अकोले, नेवासे, शेवगाव, पारनेर, कर्जत, जामखेड नगरपंचायती, पाथर्डी, संगमनेर, कोपरगाव, राहाता, शिर्डी, देवळाली प्रवरा, राहुरी, श्रीगोंदे नगरपालिका, नगर एमआयडीसी, तसेच साखर कारखान्यांत अग्निशमन यंत्रणा आहे. त्यात काही नगरपंचायतींकडे मात्र ही यंत्रणा नसल्याने ग्रामीण भागातदेखील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे सध्या तीन वाहने आणि २१ कर्मचारी आहेत. आणखी १५ कर्मचारी व दोन वाहनांची आवश्यकता आहे. आगामी काही दिवसांत एक वाहन उपलब्ध होणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी फायर सूट, हेल्मेट, गमबूट आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

- एस. यू. मिसाळ, प्रमुख, अग्निशमन विभाग