esakal | आमदार व नगरसेवकांच्या कान उघडणीनंतर महापालिकेची गटार सफाई 
sakal

बोलून बातमी शोधा

nale safai

आमदार संग्राम जगताप यांनीही नगरसेवकांसह महापालिका आयुक्‍त आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन शहरातील ओढे-नाले साफ करण्यासंदर्भात "डेडलाईन'च दिली. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने शहरात नालेसफाईची मोहीम सुरू केली आहे. 

आमदार व नगरसेवकांच्या कान उघडणीनंतर महापालिकेची गटार सफाई 

sakal_logo
By
अमित आवारी

नगर : शहरात पावसाळ्याने हजेरी लावून महिना झाला आहे. शहरातील ओढे-नाले महापालिकेच्या नगररचना विभागामुळे बंद गटारी झाल्या आहेत. तसेच शहरातील काही गटारी तुंबल्याने शहरात पूर स्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात महापालिका विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्यासह सावेडी उपनगरातील काही नगरसेवकांनी महापालिका आयुक्‍तांना थेट दुचाकीवरून शहरातील महापालिका प्रशासनाच्या बेफिकिरीचे दर्शन घडविले. आमदार संग्राम जगताप यांनीही नगरसेवकांसह महापालिका आयुक्‍त आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन शहरातील ओढे-नाले साफ करण्यासंदर्भात "डेडलाईन'च दिली. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने शहरात नालेसफाईची मोहीम सुरू केली आहे. 

हेही वाचा - "ते' काम तर महापालिकेच्या खर्चातून - बोरकर 

आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमानुसार शहरात दर पावसाळ्यात नालेसफाई, गटार सफाई, वीज तारांवरील वृक्षांची तोडणी, पूर स्थिती येऊ न देणे, धोकादायक इमारती पाडणे अशी कामे करणे अपेक्षित असते. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने ओढे-नाले व शहरातील गटार सफाईचे काम केले. शहरातील ओढे-नाले महापालिकेच्या नगररचना विभागाच्या आशीर्वादाने काही ठिकाणी गायब झाले आहेत. हे ओढे-नाले बंद गटारीच्या स्वरूपात वाहतात. या ओढ्या-नाल्यांपर्यंत शहरातील गटारीतून पाणी येते. अशा काही गटारींची स्वच्छता अजूनही झालेली नाही. त्यामुळे पहिल्याच मोठ्या पावसात सावेडी उपनगर, बोल्हेगाव, नागापूर, स्टेशन रस्त्यावरील गौतम नगर परिसरात पूर स्थिती निर्माण झाली. लोकांच्या घरात पाणी गेले. त्यामुळे संपत बारस्कर यांनी स्थानिक नगरसेवक स्वप्निल शिंदे, डॉ. सागर बोरूडे, कुमार वाकळे, माजी नगरसेवक अजिंक्‍य बोरकर, निखील वारे, बाळासाहेब पवार आदींसह आयुक्‍त मायकलवार यांची भेट घेतली. त्यांना परिस्थिती विषयी सांगितले. तसेच नगरसेवकांनी मायकलवार यांना दुचाकीवर बसवून शहरातील पूर परिस्थिती दाखविली. तसेच शहरातील अतिक्रमणे व नालेसफाईचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी केली.

आमदार संग्राम जगताप यांनीही आयुक्‍तांसह महापालिकेतील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना हे काम तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. हे काम पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्‍चित करून दिला. त्यामुळे महापालिकेकडून गटारची मोहीमच हाती घेण्यात आली आहे. 

या मोहिमेत ज्या ठिकाणी गटार सफाई झाली नाही अशा ठिकाणी सफाईचे काम सुरू आहे. गेली चार दिवसांत सावेडी उपनगरातील नित्यसेवा, भिस्तबाग चौक, एकवीरा चौक, पाईपलाईन रस्ता आदी ठिकाणी गटार सफाईचे काम झाले. आज नालेगाव व माळीवाडा परिसरात नालेसफाईचे काम सुरू आहे. या मोहिमेत सुमारे 60 कर्मचारी सहभागी आहेत. 

शहरातील ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. तसेच ओढे-नाले व गटारींची काही ठिकाणी स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे शहरात पूर स्थिती निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाला ही कामे करण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत शहरातील ओढे-नाले व गटारींचे प्रवाह खुले झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. हे पावसाळ्यापूर्वीचेच काम असल्याने या कामांची स्वतंत्र बिले ठेकेदारांना मिळणार नाहीत. 
- संपत बारस्कर, विरोधी पक्षनेते, अहमदनगर महापालिका 

पावसाचे पाणी साठू नये यासाठी शहरात गटार सफाईचे काम चार दिवसांपासून सुरू आहे. आतापर्यंत सावेडी उपनगरांत काम झाले असून माळीवाडा व नालेगाव परिसरात काम सुरू आहे. 
- डॉ. नरसिंह पैठणकर, आरोग्य अधिकारी, अहमदनगर महापालिका