नव्या नियमामुळे समीकरण बदलणार ; नगराध्यक्षांना पुन्हा राजकीय महत्त्व | Municipal Elections Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal Elections  Updates
नव्या नियमामुळे समीकरण बदलणार ; नगराध्यक्षांना पुन्हा राजकीय महत्त्व

नव्या नियमामुळे समीकरण बदलणार ; नगराध्यक्षांना पुन्हा राजकीय महत्त्व

शिर्डी : जनतेतून नगराध्यक्षांची निवड म्हणजे नव्या नेतृत्वाचा उदय, या समीकरणाचा यंदाच्या नगरपालिका निवडणुकांत अस्त होईल. यंदाच्या निवडणुकांवर प्रस्थापितांचे पूर्वापार वर्चस्व कायम राहील आणि नगरसेवकांचे लयाला जाऊ पाहणारे महत्त्व कमालीचे वाढेल. यावेळी हे या निवडणुकांचे प्रमुख वैशिष्ट्य असेल.

वीस वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांनी जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची पद्धत सुरू केली. त्यातून राज्यातील ब-याच नगरपालिकांत त्या-त्या स्थानिक प्रस्थापित आमदारांच्या विरोधात नव्या नेतृत्वाचा उदय झाला. त्या नेतृत्वाचा आणि प्रस्थापितांतील राजकीय संघर्ष सुरू झाला. दस्तुरखुद्द विलासरावांच्या लातूरमध्ये बहुमत त्यांचे आणि नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. जनार्दन वाघमारे विजयी झाले. यातून काही ठिकाणी नव्या नेतृत्वाचा उदय झाला. त्यातील काहींनी प्रस्थापितांना नमवून पुढे विधानसभादेखील गाठली. चांगली प्रतिमा असलेल्या मंडळींना नगराध्यक्षपदाच्या रूपाने सत्ता मिळाली. या निर्णयाने राज्यात मोठी राजकीय घुसळण सुरू झाल्याने, प्रस्थापितांनी या पद्धतीला एकमुखाने विरोध केला. अखेर ही पद्धत मागे घेण्यात आली. (Municipal Elections Updates)

पुढे पाच वर्षांपूर्वी राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पुन्हा जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची पद्धत सुरू केली. त्याचा भाजपला मोठा लाभ झाला. ब-याच पालिकांत नव्या नेतृत्वाचा उदय झाला. मात्र, आता महाविकास आघाडी सरकारने या पद्धतीला पुन्हा ब्रेक लावला. जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांवर अविश्वास ठरावाची टांगती तलवार नव्हती. त्यामुळे बहुमत नसतानाही त्यांना प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करीत नव्या उत्साहाने विकासकामे करणे शक्य झाले.

कोपरगावात शिवसेनेचे राजेंद्र झावरे नगराध्यक्ष झाले. त्यांनी काम करून दाखविले. शिर्डीत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचे कैलास कोते नगराध्यक्ष झाले. त्यातून त्यांचे नवे नेतृत्व आकारास आले. राहात्यात तर डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या पत्नी ममता या दोन वेळा नगराध्यक्ष झाल्या. त्यांनीही विकासकामे केली.

डॉ. पिपाडा यांनी विधानसभा निवडणूकही गाजविली. देवळाली प्रवरा नगरपालिकेत वीस वर्षांपूर्वी बाळासाहेब चव्हाण नगराध्यक्ष झाले. त्या काळात नवे नेतृत्व उदयाला आले. श्रीरामपुरात पालिकेत प्रस्थापित असलेल्या ससाणे गटावर मात करून अनुराधा आदिक यांच्या रूपाने नव्या नेतृत्वाचा उदय झाला. कोपरगावात आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे या दोन्ही मातब्बर नेत्यांचा प्रभाव असताना विजय वहाडणे नगराध्यक्ष झाले.

निवडणुकांत चित्र बदलेल

जनतेतून नगराध्यक्ष निवडला, की नगरसेवकांचे महत्त्व संपुष्टात येते. त्यांच्या नशिबी पाच वर्षे केवळ संघर्ष येतो. आता हे चित्र बदलेल, नगरसेवकांचा हरवलेला आवाज पुन्हा येईल. त्यांना आपल्या प्रभागात विकासनिधी नेण्यासाठी भांडता येईल, तर प्रस्थापितांच्या दृष्टीने ही निवडणूक सुकर होईल. कारण, त्यांच्या विरोधात निवडून आणलेले संख्याबळ टिकविणे नव्या मंडळींना अशक्य होते. इच्छा असूनही या प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणे शक्य होत नाही. त्यामुळे यंदाच्या पालिका निवडणुकांत प्रस्थापितांचा वरचष्मा कायम राहील.

Web Title: Municipal Elections Bring Back Political Importance To Mayor Vilasrao Deshmukh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..