कचरा डेपोत लाच घेताना महापालिका अधिकारी पैठणकर "चतुर्भुज"

सूर्यकांत वरकड
Wednesday, 17 February 2021

तक्रारदार यांचे राहिलेले बिल काढण्यासाठी डॉ. नरसिंह पैठणकर यांनी पाच लाच रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती अडीच लाख रुपये देण्याचे ठरले.

नगर : महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख व उपआरोग्य अधिकारी डॉ. नरसिंह सर्वोत्तमराव पैठणकर(वय 47) यांना तक्रादाराकडून अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. नाशिक येथील लाचलुचपतच्या प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. 

अधिक माहिती अशी, की तक्रारदार यांचा महानगर पालिकामध्ये मृत जनावरांच्या दाहिनीचा प्रोजेक्‍ट आहे. त्या प्रोजेक्‍ट संदर्भात "एनइइआरआय' ने त्रुटी काढल्या आहेत. 
ही सबब सांगून तक्रारदार यांचे राहिलेले बिल काढण्यासाठी डॉ. नरसिंह पैठणकर यांनी पाच लाच रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती अडीच लाख रुपये देण्याचे ठरले.

हेही वाचा - कार्यकर्ते पलंगावर, आमदार लंके जमिनीवर

गुरुवारी (ता. 11) रोजी डॉ. पैठणकर यांना तक्रारदार यांच्याकडून अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी पंचाक्षम केली. ती लाचेची रक्कम बुधवारी (ता. 17) सावेडी कचरा डेपो येथे पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक मृदूला एम नाईक यांच्या पथकाने केली. 

निलंबनानंतर आले होते कामावर
डॉ. पैठणकर हे यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी निलंबित केले होते. मात्र, तत्कालीन महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे पदाची सूत्रे येताच त्यांना पुन्हा कामावर हजर करून घेतले होते. त्यानंतरही त्यांच्या कार्यपद्धतीमुळे स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत ते टिकेचे केंद्र ठरले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal officer Paithankar caught taking bribe at garbage depot