
राज्य शासनाने 3 जुलैला आदेश काढून सर्व महापालिकांना ऑनलाईन सभा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार अहमदनगर महापालिकेची स्थायी समितीची सभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला आहे. अहमदनगर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सभा ऑनलाईन होणार आहे.
नगर : शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या बैठका ऑनलाईन होत आहेत. हा कित्ता आता महापालिकेलाही गिरवावा लागणार आहे. गेली चार महिन्यांपासून महापालिकेतील एकही महत्त्वाची सभा झाली नाही. शहरातील अनेक विकास कामे मंजुरी अभावी पडून आहेत. राज्य शासनाने 3 जुलैला आदेश काढून सर्व महापालिकांना ऑनलाईन सभा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार अहमदनगर महापालिकेची स्थायी समितीची सभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला आहे. अहमदनगर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सभा ऑनलाईन होणार आहे.
अवश्य वाचा - पुन्हा "काम बंद'चा इशारा देताच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 23 मार्चपासून लॉकडाउन केला आहे. गेली 15 दिवसांपासून लॉकडाउनमध्ये केंद्र व राज्य शासनाने शिथिलता आणली आहे. या चार महिन्यांत महापालिकेला करायची अनेक विकास कामे, त्यांच्या मंजुऱ्या घेणे बाकी होते. मात्र लॉकडाउनमुळे अनेक विकास कामांना मंजुरी मिळाली नाही. महापालिकेचा अर्थसंकल्पही कोरोनामुळे महासभेकडून मंजूर झालेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या विविध सभा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात याव्यात अशी मागणी होत होती. त्यानुसार राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी आदेश काढून महापालिका, नगरपरिषदा, नगर पंचायतीच्या सर्वसाधारण व विविध विषय समित्यांची सभा ऑनलाईन घेण्यास परवानगी दिली. ही परवानगी मिळताच अहमदनगर महापालिकेतून सर्वसाधारण सभा व स्थायी समितीची ऑनलाईन सभा बोलावण्याची मागणी होऊ लागली. त्यानुसार महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना ऑनलाईन सभा बोलावण्याची मागणी केली होती.
त्यानुसार स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांनीही ऑनलाईन स्थायी समितीची सभा घ्यावी अशी मागणी केली. आज महापालिकेच्या नगरसचिव विभागाने स्थायी समितीची ऑनलाईन सभा घेण्याचा निर्णय घेतला. स्थायी समितीची ऑनलाईन सभा 21 जुलैला दुपारी एक वाजता होणार आहे. या सभेत 21 विषयांवर चर्चा होणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत केवळ आठच सदस्य आहेत. त्यामुळेही सभा ऑनलाईन होणे शक्य होणार आहे.